सटाणा, 25 एप्रिल : कोरोनाच्या या काळामध्ये मानसिक आरोग्य (Mental Health) चांगलं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोरोनामुळं रोज जवळची माणसं आपण गमावत आहोत. कोणताही विषय निघाला की कोरोनाच्या नकारात्मक बातम्या (Negativity) आणि त्यामुळं वाढणारी चिंता. अशाच एकूणच नकारात्मक परिस्थितीमध्ये नाशिकच्या सटाणा इथं पोलीस निरीक्षकांच्या एका उपक्रमानं सकारात्मक बदल पाहायला मिळाले.
(वाचा-Covid Crisis: टाटा आले धावून! ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर सिंगापूरहून मागवले कंटेनर)
नाशिकमधील सटाणा शहराच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये आधी कोरोनानं बळी घेतलेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण केलेल्यांचे फोटो असलेले फलक होते. सगळीकडं कोरोनानं होणाऱ्या मृत्यूच्या बातम्या. टीव्ही, सोशल मीडिया सगळीकडंच आणि रस्त्यावरही तेच. त्यामुळं जणू सगळीकडं नकारात्मकता आल्याचं पाहायला मिळत होतं. अशा परिस्थितीत सटाणा येथील सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी एक पाऊल उचललं. त्यांनी श्रद्धांजलीचे हे फलक हटवले आणि ज्यांनी कोरोनावर मात केली त्यांचे फलक चौकांमध्ये लावले. नागरिकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. नागरिकांनाही दिलासा वाटू लागल्यानं या उपक्रमाचं कौतुक झालं.
(वाचा-Oxygenचा तुटवडा होणार कमी, PM CARES फंडातून मोदी सरकार सुरू करणार 551 प्लांट)
सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी स्वतःच्या अनुभवातून हा उपक्रम सुचल्याचं म्हटलं आहे. शिंदे यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. पण केवळ नकारात्मकता कमी केल्यानं त्यांनी अवघ्या तीन दिवसांत कोरोनावर मात केली. त्यामुळं सकारात्मक वातावरण गरजेचं असल्याचं शिंदे म्हणाले. त्यांनी आधी स्वतःच्या गावातही हा उपक्रम राबवला आणि प्रतिसाद मिळाल्यानं सटाणामध्ये तो राबवला.
कोरोनामधून आम्ही बरे झालो आहोत, तुम्हीही बरे व्हाल काळजी करू नका, असा संदेश चौका चौकात फलकांद्वारे देण्यात आला. त्यातून अनेकांनी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचं सांगितलं. समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर केवळ तुम्ही पैसाच खर्च करावा लागेल किंवा कुणाच्या तरी मदतीला धावूनच जावं लागेल असं नाही. तर तुमचा एक चांगला विचारही समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Nashik