नाशिक, 18 ऑगस्ट : नाशकात खळबळजनक घटना घडली आहे. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या (Vasantrao Pawar Medical College) हॉस्टेलमध्ये डॉ स्वप्नील शिंदे (Swapnil Shinde) या MD च्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अत्यंत हुशार असलेला डॉ स्वप्नील हा रॅगिंगचा बळी असल्याचा धक्कादायक आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानं या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. कॉलेज प्रशासनाच्या भूमिकेवरही डॉ स्वप्नीलच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, दोषींवर जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका शिंदेच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. डॉ स्वप्नील महारुद्र शिंदे हा कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधून 2018ला MBBS झाला. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलनं चक्क गोल्ड मेडल मिळवलं. आपल्या MBBS शिक्षणासाठीही स्वप्नीलला, सरकारी कोट्यातून मेरिटवर ऍडमिशन मिळाली होती. आपल्या अभ्यासू गुणांनी स्वप्नील हा विद्यार्थ्यांत लोकप्रिय होता मात्र त्याच्या याच हुषारीचा काहींना अतोनात राग होता. नाशिकला तेच झालं आणि त्याच्या सिनिअर असलेल्या 2 विद्यार्थिनींनी त्याचा छळ सुरू केल्याचा आरोप त्याचे वडील महारुद्र शिंदे यांनी केला आहे. नाशिक शिकाऊ डॉक्टर आत्महत्या प्रकरण, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत डॉ स्वप्नीलच्या मृतदेहाचं पोस्टमार्टेम करण्यात आलंय. स्वप्नीलचा आतेभाऊ डॉक्टर असल्यानं हे पोस्टमार्टेम होतांना तो आत होता आणि याच ठिकाणी काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. स्वप्नीलच्या छातीवर भयंकर आघात केल्यानं त्याच्या फासळ्या तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हा मृत्यू की घातपात ? हा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. स्वप्नीलचा आतेभाऊ डॉ कृष्णा राक्षे हा पोस्टमार्टेम होतांना आतमध्ये होता. सिनिअर विद्यार्थीनी असलेल्या 2 डॉक्टर मुलींनी रॅगिंग केल्याचा आरोप कुटुंबीय करताय. या दोघींच्या छळामुळे 6 महिन्यांपूर्वीही डॉ स्वप्नीलनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी लिहिलेल्या सुसाईड नोट या 2 विद्यार्थीनींनींचा उल्लेखही केला होता. मेडिकल कॉलेज प्रशासनानं त्यावेळी यावर बैठक घेऊन त्या मुलींना समजही दिली होती असं डीन डॉ मृणाल पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतांना मान्यही केलं. मात्र, आता डॉ स्वप्नील हा मानसिक रुग्ण असल्याचा दावा डीन करताय. त्यांच्या याच भूमिकेवर, डॉ स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतलाय. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, रॅगिंग प्रकरणातून घातपात झाल्याचा आरोप स् दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल सरकारनं घेतलीये. या प्रकरणाचा अहवाल मंत्रालयानं मागवलाय. वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. MD गायनॅक या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीही डॉ स्वप्नीलला त्याच्या हुशारीनं, सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला होता. त्याचं हे पहिलं वर्ष… शेतकरी कुटुंबातील स्वप्नीलची अखेर अश्या पध्दतीनं झाल्यानं हळहळ व्यक्त होत असली तरी रॅगिंग अजूनही होत असल्याची माहिती समोर आल्यानं, कायदे किती तोकडे आहे याची जाणीव होतेय. आपल्या संस्थेची इमेज जपण्यात जर संस्था खरोखर अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल तर हे नक्कीच घातक आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करून दिवंगत डॉ स्वप्नीलला न्याय द्यावा, ही अपेक्षा आहे त्याच्या कुटुंबियांची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.