लासलगाव, 31 ऑक्टोबर: नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बस स्थानक परिसरात एका एसटी चालकाना कंटेनरने चिरडल्याची (container crushed ST driver on road) घटना समोर आली आहे. आरोपी कंटेनर चालकाने एसटीला कट मारल्यानंतर, एसटी चालकाला 100 ते 150 मीटर अंतर निर्दयीपणे फरफटत नेत जीव घेतला आहे. शनिवारी सकाळी घडलेल्या या थरारक घटनेनंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ही घटना घडताच आरोपी चालकाने कंटेनर घटनास्थळी सोडून पळ काढला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनर चालकाचा शोध घेतला जात आहे.
संबंधित दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या एसटी चालकाचं नाव संदीप मांगुजी निकम आहे. मृत निकम हे शनिवारी सकाळी लासलगावहून नाशिकला जाण्यासाठी आगारातून बस घेऊन लासलगाव बसस्थानकाच्या दिशेने येत होते. दरम्यान, चांदवडहून लासलगावकडे येणाऱ्या नारंगी रंगाच्या एका कंटेनरने एसटी बसला कट मारला. यावेळी एसटीचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी एसटी चालक निकम बसमधून खाली उतरले. यावेळी कंटेनर चालकाने एसटी चालक निकम यांच्या अंगावर कंटेनर घातला.
हेही वाचा-"पगार कमी, उच्च शिक्षण घेता येत नाही" ST कर्मचाऱ्याच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल
यावेळी निकम हे कंटेनरच्या पुढील बाजूस लटकले. अशाच अवस्थेत कंटेनर चालकाने निकम यांना 100 ते 150 मीटर फरफटत नेलं. यावेळी निकम जीवाच्या आकांताने कंटेनर थांबवण्यासाठी ओरडत होते. पण चालकाने कंटेनर थांबवला नाही. कंटेनर वेगात असल्याने निकम यांचा हात सुटला आणि थेट कंटेनर खाली गेले. यातच निकम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपीनं चालत्या कंटेनरमधून उडी घेत घटनास्थळावरून धूम ठोकली आहे. दरम्यान हा कंटेनर गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील योगेश ऑटोमोबाइल्स आणि लतीफ स्प्रे पेंटिंग या दुकानात घुसला. या दोन्ही दुकानांच देखील प्रचंड नुकसान झालं आहे. यावेळी दुकानात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
हेही वाचा- दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला राक्षस; चौघांना केलं रक्तबंबाळ
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृत निकम यांच्या नातेवाईकांनी जोपर्यंत एसटी प्रशासनाकडून मदतीचं लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. यामुळे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. यासोबतच चालक, वाहक आणि एसटी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कंटेनर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपी कंटेनर चालक सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Nashik