नाशिक, 21 एप्रिल : ‘हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) दुर्घटनेवर आपली भावना व्यक्त केली. झाकीर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत 22 जण दगावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहे. ‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
रोहित शर्माचा जबरदस्त सिक्स पाहून रितिका-नताशासह मुंबईची गर्ल्स गँग थक्क
‘ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसंच, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे, हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे, केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळती, मृतांच्या नातेवाईकाने केला मोठा दावा
‘कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी, असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानी बद्दल राज्यपालांना दुःख नाशिक येथे ऑक्सिजन टाकीतून प्राणवायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत करोना रुग्णांच्या झालेल्या जीवितहानी बद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध करोना रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.