चंद्रपूर, 2 सप्टेंबर : जिल्ह्यातील शाळा फी वाढ आणि विद्यार्थी अन्याय प्रकरण न्यूज 18 लोकमतने लावून धरलं होतं. अखेर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. आज 13 टीसी परत घेण्याचे शाळेने मान्य केले आहे. या लढ्यामध्ये न्यूज 18 लोकमतने दिलेल्या सहकार्यासाठी पालकांनी आभार मानले आहेत. चंद्रपुरच्या (Chandrapur) नारायाण विद्यालयम शाळेने 13 विद्यार्थ्यांना रजिस्टर्ड पोस्टाद्वारे टीसी देत शाळेतून काढून टाकले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मनमानी फीवाढी विरोधात आवाज उचलला होता. पालकांनी एकजूट करत हा मुद्दा वरिष्ठ स्तरावर उचलून मोठ्या संघर्षाची सुरुवात केली होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. याप्रकरणी पालक एकजुटीचा विजय पाहायला मिळत आहे.
चंद्रपूरच्या नारायणा विद्यालयम शाळा टीसी प्रकरणात अखेर पालकांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दोन्ही बाजूंची एकत्र बैठक बोलावली होती. यात प्रशासनाने कठोर भूमिका घेताच शाळा व्यवस्थापन नरमले. जि. प. अध्यक्ष-विरोधी गटनेते-मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिवसभर बैठकांचे सत्र घेतले. यावर विद्यार्थ्यांच्या पोस्टाने पाठविलेल्या टीसी परत घेत पुनर्प्रवेश दिला जाण्याचा तोडगा निघाला. संघर्षाचा मुद्दा असलेल्या शाळा फी वाढीबाबत सत्र संपताच पालक-शाळा एकत्रीतपणे निर्णय घेणार आहे. शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात दंड थोपटलेल्या पालकांना जिल्हा परिषदेची साथ मिळाल्याने पालक समाधानी आहेत. शाळेने फी वाढीविरोधात आवाज उचलल्याने 13 विद्यार्थ्यांना रजिस्टर्ड पोस्टाने टीसी पाठविल्याने आधीच वादात अडकलेली शाळा पुन्हा चर्चेत आली होती. या एकूणच प्रकरणाचा न्यूज 18 लोकमतने वारंवार व सातत्याने पाठपुरावा केला होता.
हे ही वाचा-वसईच्या भुईगाव समुद्रात आढळली संशयास्पद बोट, सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश
गेली दोन वर्षे शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालक संघर्ष करत होते. मात्र यामुळे पालकांनी मात्र या वेळेस प्रथमच जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी यात संवेदनशील भूमिका दाखविली. यामुळेच हा तिढा सुटण्यास मदत झाली आहे. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. व फी वाढीचा मुद्दाही सामोपचाराने निकाली निघेल असे दृष्टीस पडत असल्याने पालक समाधानी दिसले. राज्यातील शाळांच्या मनमानी फी वाढी विरोधात पालक वेगवेगळ्या स्तरावर लढा देत आहेत. या लढ्याला शिक्षण विभागाची योग्य साथ मिळाल्यास तोडगा निघू शकतो. हे चंद्रपूरच्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. शेवटी विद्यार्थी हित महत्त्वाचे हेच सर्व घटकांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.