पोलिसांनी 3000 मागितले, खंडणी दिली नाही म्हणून जबर मारहाण, नागपूरची धक्कादायक घटना
पोलिसांनी 3000 मागितले, खंडणी दिली नाही म्हणून जबर मारहाण, नागपूरची धक्कादायक घटना
तीन हजार रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून एका हॉटेल व्यवसायिक तरुणाला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाणेमधील दोन कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केल्याची तक्रार पुढे आली आहे.
नागपूर, 13 मे : तीन हजार रुपयांची खंडणी (Ransom) दिली नाही म्हणून एका हॉटेल व्यवसायिक तरुणाला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाणेमधील (Nagpur sitabuldi police station) दोन कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण (Beat) केल्याची तक्रार पुढे आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर स्पष्टीकरण देणार असल्याचा नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) खुलासा केलाय.
मंगेश सरोज नावाचा तरुण नागपूरच्या रामदास पेठ भागातील निधी गौरव या इमारतीसमोर हात ठेला लावतो. सायंकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत तो आपल्या हातठेल्यावरून नाश्ताचे खाद्यपदार्थ विक्री करतो. या दरम्यान 6 मे रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याच्याजवळ आले आणि त्यांनी तीन हजार रुपयांची खंडणी मागितली. मंगेशने खंडणी न दिल्याने पोलिसांनी त्याला जबर मारहाण केली. तसेच उद्यापासून दुकान उघडायचा नाही असा दम दिला. मंगेशने भीतीपोटी दुसऱ्यादिवशी दुकान उघडले नाही. मात्र परत 8 तारखेला रविवार असल्याने दुकान उघडले. याबाबत संबंधित पोलिसांनी माहिती पडताच त्यांनी त्याला परत जबर मारहाण केली, अशी तक्रार मंगेश सरोजने पोलीस उपायुक्तांना दिली.
(पायलटची तब्येत बिघडल्यानंतर प्रवाशाने प्लेन कसं केलं लँड; Video पाहून धक्काच बसेल!)
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवर असे खंडणीचे आरोप होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील असे प्रकार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आहेत. या प्रकरणा संदर्भात आम्ही सीताबर्डी पोलीस ठाण्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. मात्र पोलीस निरीक्षक सुट्टीवर असल्याने त्यांनी यावर बोलायला नकार दिला. त्यानंतर यासंदर्भात आम्ही परिमंडळ दोनच्या उपायुक्तांना देखील विचारणा केली. मात्र सुरुवातीला त्यांनी फोन उचलला नाही.
काही वेळानंतर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांनी फोनवरुन आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली की यासंदर्भात आम्ही पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यावर स्पष्टीकरण दिले जाईल. दरम्यान, नागपूरची गुन्हेगारी ही आधीच पोलिसांची डोकेदुखी ठरत असतांना काही पोलीस कर्मचाऱ्यांची वागणूक ही देखील वरिष्ठांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.