नागपूर, 27 मे: मुंबईतील नागरिकांना करोना (Corona) प्रतिबंधक लसींचे डोस (Vaccine) लवकरात लवकर देण्यात यावे यासाठी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढले आहे. या ग्लोबल टेंडरला 8 पुरवठादारांचा प्रतिसाद मिळाला असून लवकरच लसींचाही पुरवठा होणार आहे. मुंबई मनपाला ज्याप्रकारे ग्लोबल टेंडर (Global Tender for vaccine) काढण्याची परवानगी देण्यात आली तशीच परवानगी इतर मनपांनाही राज्य सरकारने द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे.
न्याय समान हवा, जो न्याय मुंबईला तोच इतर मनपांना द्या
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, लसींच्या ग्लोबल टेंडरसाठी पुणे, नागपूर मनपाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे आणि इतरही मनपांनी अशाच प्रकारे ग्लोबल टेंडरसाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद मिळाला आहे. एकूणच न्याय समान असला पाहिजे जर टेंडर काढायची परवानगी देता तर सर्वांनाच दिली पाहिजे. जो न्याय मुंबईला दिला तोच न्याय नागपूर, पुणे, नाशिकला द्यावा इतकीच आमची राज्य सरकारला विनंती आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) May 27, 2021
होम आयसोलेशन रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याच्या महापौरांनी होम आयसोलेशन रद्द करण्याच्या संदर्भात भूमिका मांडली आहे. सरकारने होम आयसोलेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्याचं कारण काय आहे हे सरकारने सांगावं. आता लाट कमी होत आहे अशा परिस्थितीत होम आयसोलेशन बंद करुन इंन्स्टिट्यूशनल आयसोलेशनमध्ये जावं हे थोडसं सर्वांना कठिण वाटत आहे. हा निर्णय जर काही वैज्ञानिक आधारावर घेतला असेल तर तसं राज्य सरकारने सांगावं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यात काही जिल्ह्यांत रुग्णवाढीला ब्रेक लागला असला तरी सर्वच ठिकाणी रुग्णवाढ थांबलेली नाहीये. यामुळेच राज्य सरकारने सरसरकट लॉकडाऊन न उठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यात येणार असून काही ठिकाणी नियमांत शिथिलता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Devendra Fadnavis, Nagpur