माणुसकीसाठी लढतायेत अब्दुल-अहमद-अलीम-आरीफ; 802 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

माणुसकीसाठी लढतायेत अब्दुल-अहमद-अलीम-आरीफ; 802 मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

यवतमाळातील 4 मुस्लीम तरुणांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानव धर्माचे दर्शन घडवत 800 पेक्षा जास्त मृतकांवर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

  • Share this:

यवतमाळ, 23 एप्रिल : कोरोना काळात रक्तातील नातं ही दुरावल्या गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. घरातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली की सर्वचजण त्याच्यापासून दूर जातात. मात्र यवतमाळातील 4 मुस्लीम तरुणांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानव धर्माचे दर्शन घडवत 800 पेक्षा जास्त मृतकांवर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

यवतमाळ जिल्ह्यात सध्या कोरोनाने चांगलाच कहर केला आहे. आतापर्यंत येथे 44,556 नागरिक कोरोनाने बाधित झाले तर 1028 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एखाद्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. इतर वेळी आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग असलेल्या अंत्ययात्रा या स्मशानाने पाहिल्या आहेत. मात्र कोरोनामुळे परिस्थिती बदलली. घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या अंतिम संस्काराला जाण्यासाठी कोणीही धजावत नाही.

हे ही वाचा-पुजाऱ्यांच्या मदतीला धावून आले ओवैसी, Corona लागण झाल्यानंतर केलं मोठं साहाय्य

अशा स्थितीत यवतमाळातील अब्दुल जब्बार, शेख अहमद, शेख अलीम, आरीफ खान या तरुणांनी परिवार, कुटुंब, धर्म, समाज बाजूला ठेवून स्वतःच्या जीवाची बाजी लावत 800 पेक्षा जास्त कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले. एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर इष्ट-मित्र तर सोडाच पण घरातील व्यक्तीही बाधिताजवळ जाण्यापूर्वी  विचार करताना दिसतात.

इच्छा असली तरी तसं करता येत नाही. त्यातच मृत्यू झाल्यानंतर आप्तस्वकीयांना जिथे चेहराही पाहता येणे शक्य होत नाही. तिथे अंत्यसंस्कार तर दुरचीच गोष्ट. मात्र असे असतानाही कोरोनाचा संसर्गाचा धोका असूनही स्मशानामध्ये अशा शेकडो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर त्यांच्या धर्मातील चालीरितींप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे काम अब्दुल जब्बार, शेख अहमद, शेख अलीम आणि आरीफ खान हे चार युवक पार पाडत आहेत. 17 ते 18 वर्षांपासून जब्बार आणि अहेमद हे दोघे स्मशान भूमीत काम करून उदरनिर्वाह करत होते.

त्यानंतर कालांतराने कोणाचेही प्रेत असो ते दोघेच सरण रचण्याचं काम करायला लागले. आता कोरोनाच्या काळात ते अंतिम संस्काराचे काम करत आहेत. प्रेता सोबत कोणी नातेवाईक असो वा नसो. सगळ्याचे अंतिम संस्कार त्याच्या धर्माप्रमाणे करत आहे. आतापर्यंत 802 लोकांवर त्यांनी अंतिम संस्कार केले. हे सगळं काम आम्ही अल्लाहवर विश्वास ठेऊन करतो आहे आणि पुढेही करत राहणार असं ते सांगतात.

हे ही वाचा-वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 जणांवर अंत्यसंस्कार

अब्दुल जब्बार याबाबत म्हणाले की, कोरोनाच्या काळात बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारी प्रशासनाने नगर पालिकेवर सोपवली. त्यासाठी नगर पालिकेने दोन चमू तयार केल्या आणि त्यांच्या माध्यमातून अंत्यसंस्काराचे कार्य सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातून मृतदेह घेऊन तो स्मशानातील चितेपर्यंत पोहचविण्याचे आणि त्या ठिकाणी त्यावर योग्य अंत्यसंस्कार करुन घेण्याचे काम यांनी अविरत केले आहे. असे असले तरी ज्यावेळी कोरोना योद्धा्यांचे नाव पुढे येते त्यावेळी अत्यंत जोखमीचे आणि खऱ्या अर्थाने माणुसकीचे काम करणारे सच्चे कोरोना योद्धे असलेले अब्लुल जब्बार, शेख अहमद सारखे युवक अद्यापही उपेक्षित असल्याचे दिसून येते, अशी भावना पालिका प्रशासन वैद्यकीय अधिकारी डॉ विजय अग्रवाल यांनी दिली.

Published by: Meenal Gangurde
First published: April 23, 2021, 6:31 PM IST

ताज्या बातम्या