मुंबई, 26 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. पण, सहा महिन्यांपासून कोरोनाशी सामना करणारी मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरू होईल का, या प्रश्नाचे मुंबईचे आयुक्त इकबाल चहल यांनी सूचक उत्तर दिले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईची लाइफलाउन समजली जाणारी लोकल सेवा ठप्प आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल चालवली जात आहे. पण, सर्व सामन्य प्रवाशांना यात प्रवास करण्यास मुभा नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी म्हटलं आहे की, ‘मुंबईत आता कोरोनाबाधित दर हा 1 टक्क्याने कमी झाला आहे. परंतु, मुंबईला लागून असलेल्या उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आता उपनगरांमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणार आहे.’ पंतप्रधानांच्या स्वप्नावर उद्धव ठाकरेंनी फेरले पाणी,फडणवीसांसह भाजपला मोठा हादरा तसंच, ‘मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई लोकल सेवा ही सुरू करता येऊ शकते. परंतु, तुर्तास सरकारकडून अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू आहे. शासकीय कर्मचारी आणि खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे.’ असंही चहल म्हणाले. विशेष म्हणजे, शनिवारीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सामनाला दिलेल्या मुलाखतीत लोकल सुरू करण्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले होते. ‘अजूनही रेल्वे सुरू होत नाही. लोकांनी प्रवास कसा करायचा?’ या संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘म्हणूनच मी म्हणतो ना, एकदा काय ते ठरवा. इस पार या उस पार. आणि जर दोन्ही सांभाळायचं असेल तर रेल्वे रुळावरून चालली पाहिजे. तसेच ही तारेवरची कसरत आहे. रेल्वे सुरू करूया. वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. घाईगडबडीने, घिसाडघाईने तुम्हाला निर्णय घ्यायचाय? पण लक्षात घ्या, कुटुंबंच्या कुटुंबं आजारी पडताहेत आणि मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार? म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा,’ अशा शब्दांमध्ये लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.