Home /News /mumbai /

मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, लॉकडाऊन, विरोधी पक्षाचे आरोप यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

    मुंबई, 25 जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, लॉकडाऊन, विरोधी पक्षाचे आरोप यांसारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसंच मुंबईची लोकल सेवा सुरू होणार का? या प्रश्नालाही उत्तर दिलं आहे. 'अजूनही रेल्वे सुरू होत नाही. लोकांनी प्रवास कसा करायचा?' या संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'म्हणूनच मी म्हणतो ना, एकदा काय ते ठरवा. इस पार या उस पार. आणि जर दोन्ही सांभाळायचं असेल तर रेल्वे रुळावरून चालली पाहिजे. तसेच ही तारेवरची कसरत आहे. रेल्वे सुरू करूया. वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. घाईगडबडीने, घिसाडघाईने तुम्हाला निर्णय घ्यायचाय? पण लक्षात घ्या, कुटुंबंच्या कुटुंबं आजारी पडताहेत आणि मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार? म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा,' अशा शब्दांमध्ये लॉकडाऊनबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे...' ‘पुनश्च हरिओम’ म्हणतो किंवा ‘मिशन बिगिन अगेन.’ ते करताना नीट विषय समजून घ्यायला हवा की लॉकडाऊन केलेला आहेच. लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढतोय. नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांचे प्रश्न, उद्धव ठाकरेंची उत्तरे... प्रश्न : लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे… – त्यासाठी एकदम जर घिसाडघाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? म्हणून एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की, कोरोनाचं काय व्हायचं ते होईल, किती माणसे मृत्युमुखी पडतील ती पडतील, पण आम्हाला लॉकडाऊन नको. आहे का तयारी? प्रश्न : मुंबईसुद्धा हळूहळू स्थिरस्थावर होतेय, पण मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार? – त्यासाठी तयारी सुरू आहे. हळुवार वाटचाल त्या दिशेने चालू आहे. एक दिवस नक्की मिळेल. प्रश्न : मुंबईच्या रस्त्यावर जोपर्यंत वडापाव मिळत नाही तोपर्यंत मुंबई सुरळीत झाली असे या देशात कुणी मानणार नाही… – वडापाव मिळायला हवा. शिवाय आणखीही बऱयाच गोष्टी आहेत त्याही मिळायला हव्यात. आपण हळूहळू त्या दिशेने जात आहोत. प्रश्न : मंदिरांची टाळी कधी उघडणार? – देव म्हणताहेत मी तुमच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका. आधी हे कोरोनाचं संकट सांभाळा. गाडगेबाबांची एक कथा मला माझ्या आजोबांनी सांगितली होती ती आठवते. ती चरित्रात पण लिहिलेली आहे. गाडगेबाबा पंढरपूरला जायचे. यात्रा असायची. म्हणजे वारी. या वेळेला ती वारीही होऊ शकली नाही. असो. पण त्या काळी गाडगेबाबा पंढरपूरला जायचे ते मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायच्या आधी किंवा दर्शनाऐवजी चंद्रभागेचा काठ सकाळी खराटं घेऊन साफ करायला लागायचे. आणि त्यांना कुणी विचारलं की काय बाबा, दर्शन घेतलं का? त्यावर ते म्हणायचे, हे बघा, हे गोरगरीब माताभगिनी, मायबाप सगळे आले आहेत, हाच माझा विठोबा आहे. यांच्यातच मला विठोबा दिसतो. इकडे सगळी अस्वच्छता माजली तर रोगराई येईल. मग त्याचे काय होणार? त्यामुळे ते स्वतः खराटा घेऊन तो सगळा परिसर स्वच्छ करायचे. आता आम्ही त्यांच्या नावाने अभियान करतो, पण स्वतः काय करतो? स्वच्छ केलेल्या कोपऱ्यात झाडू मारून फोटो काढतो.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Mumbai local, Uddhav thackeray

    पुढील बातम्या