Home /News /mumbai /

Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut: आम्ही देखील पाहून घेऊ, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

Ed raids on Anil Parab properties: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे.

    मुंबई, 26 मे : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानी ईडीकडून धाड टाकण्यात आली. यासोबतच अनिल परबांच्या संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, दापोलीत ईडीकडून धाडसत्र सुरू आहे. ईडीचे सहाय्यक संचालक तासीन सुलतान हे अनिल परबांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तासीन सुलतान हे अनिल देशमुख यांच्या कारवाईतील मुख्य अधिकारी आहेत. अनिल परबांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागताच शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक इशाराच दिला आहे. (Ed raids on Anil Parab properties) शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं, "अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सुडबुद्धीने सुरू आहेत. ज्याप्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावण्यात येत आहेत त्यापेक्षाही गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कुणीही हात लावत नाहीत. आम्ही सर्वजण, पक्ष, सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत." वाचा : अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी संजय राऊत पुढे म्हणाले, "तुम्ही सुडाच्या आणि बदल्याच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कुठलाही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पडतील. सरकार सुरळीत चालेल. अशा कारवायांमुळे भाजप दररोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या 55 वर्षांत कधीच मिळालं नव्हतं. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरण करायचं असं वाटत असेल तर शिवसेनेचे, महाविकास आघाडीचं मनोबल खच्चीकरण होणार नाही तर वाढेल." संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, "विक्रांत घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असं मी मानतो. शौचायल घोटाळा हा सुद्धा पुढे येईल. आम्ही पुरावे पाठवलेत पण कुणीही लक्ष देत नाही. पण एक लक्षात घ्या आम्ही सुद्धा पाहून घेऊ." वाचा : "देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी" सोमय्यांचं मोठं वक्तव्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत. शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. पुण्यात छापेमारी पुण्यात विभास साठे यांच्या निवासस्थानी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातील पलेडियम इमारतीत विभास साठे यांचं घर आहे. विभास साठे यांच्याकडूनच दोपोलीत अनिल परबांनी रिसॉर्ट खरेदी केला होता. याच रिसॉर्टच्या बांधकामासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात छापेमारी सुरू आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Anil parab, ED, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या