मुंबई, 26 मे : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. (Ed raids on Maharashtra Minister Anil Parab properties in Mumbai, Pune)
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं आहे. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचं वृत्त समोर येत आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परबांच्या पुण्यातील मालमत्तांवरही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
Enforcement Directorate conducts raids at seven locations in Pune and Mumbai of Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab
— ANI (@ANI) May 26, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाडसत्र सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी महानगरपालिकेपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शिवसेनेला एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यात छापेमारी
पुण्यात विभास साठे यांच्या निवासस्थानी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुण्यातील पलेडियम इमारतीत विभास साठे यांचं घर आहे. विभास साठे यांच्याकडूनच दोपोलीत अनिल परबांनी रिसॉर्ट खरेदी केला होता. याच रिसॉर्टच्या बांधकामासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात छापेमारी सुरू आहे.
वाचा : विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर, 10 जागांसाठी कुणाला मिळणार संधी?
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.
सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.
अनिल परबांवर आरोप आणि छापेमारी
अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, ED, Shiv sena