मुंबई, 20 एप्रिल: मुंबईत आज दुसऱ्यांना लसीकरण (Mumbai Corona Vaccination) केंद्राबाहेर नागरिकांची मोठी झुंबड उडालेली बघायला मिळाली. कारण लस उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण थांबवण्यात आल्याची घटना घडली. रविवारी रात्री मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर तब्बल दीड लाख लसींचा साठा उपलब्ध करण्यात आला होता. या साठ्यामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन्ही लसींचा समावेश होता. सोमवारी सर्व लसीकरण पूर्ण झाल्यावर मंगळवारसाठी प्रत्येक केंद्रावर थोडाच साठा शिल्लक होता. खासगी रुग्णालयात तर अनेक ठिकाणी लसींचा साठा संपला होता. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत लस उपलब्ध झाली नाही तर मंगळवारी लसीकरण मोहीम बंद पडेल अशी शक्यता होती आणि तेच चित्र आज निर्माण झाले. मुंबईच्या सर्वात मोठ्या लसीकरण केंद्रावर म्हणजे बीकेसी लसीकरण केंद्रावर आज सकाळी केवळ चारशे जणांना कोविशिल्ड ही लस देण्यात आली. त्यानंतर साठा उपलब्ध नसल्यामुळे नवीन लस घेण्यासाठी आलेले आणि कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले आहे. हेही वाचा - मोठी बातमी! Remdesivir बाबत सरकारी टेंडरकडे कंपन्यांनी फिरवली पाठ; राज्य सरकारसमोर पेच कोवॅक्सीन लस घेतलेल्या लोकांना दुसरा डोस या केंद्रावर उपलब्ध करून दिला जात आहे. परंतु त्याचा साठाही केवळ दोन हजार इतका शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या केंद्रावर आज लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचा मोठा हिरमोड झाला आहे. विशेषत: यामध्ये वयोवृद्ध नागरिकांचा समावेश होता. अनेक लोक हे लांब अंतरावरून पैसे खर्च करून आल्यामुळे लसीकरण न झाल्याने नाराज होऊन निघून गेले. तर काही नागरिकांनी आधी जे टप्पे घोषित केले आहे त्या लोकांना लसीकरण पूर्ण करा आणि त्यानंतर उर्वरित किंवा नवीन टप्प्यांना लसीकरण सुरू करा अशी मागणी केलेली आहे. मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्र लवकरच 200000 मुंबईकरांना लसीकरण करणारं देशातलं पहिलं केंद्र बनणार आहे. परंतु सध्या या केंद्रावर लस उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्यांदा लसीकरण बंद करण्याची वेळ आलेली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तो साठा मिळाला तर बुधवारी लसीकरण सुरू राहील अन्यथा बुधवारीही लसीकरण बंद ठेवावे लागेल, अशी भीती या केंद्राचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ढेरे यांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.