मुंबई, 6 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि केंद्र सरकारवर नाव न घेता खोचक वार केला आहे. ते भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला. “खाजगीकरणाची खाज आज वाढायला लागलीय. कुठे-कुठे खाजवणार? भवितव्य अंधारात जाणार असेल तर आपणाला न्याय हक्काची लढाई लढावी लागेल. भगव्यात ती ताकद सिद्ध करण्याची वेळ आलीय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? “खासगीकरणाची खाज वाढायला लागली आहे. कुठे-कुठे खाजवणार आणि काय-काय खासगीकरण करणार हे कल्पत नाही. एलआयसीतही खासगीकरण सुरु झालं आहे. भवितव्य अंधारात जात असेल तर आपल्या संघटनेचं काम महत्त्वाचं आहे. सगळ्याचं प्रतिनिधी म्हणून काम करायला हवं. हे संपूर्ण देशात पसरलेलं आहे. देशभर आपण उभं राहू शकतो. ज्यावेळी कोणी तुमच्यावर अन्यायाचा वार करेल त्या वारचा मुकाबला करण्याची ताकद आणि हिंमत आपल्या भगव्यामध्ये आहे”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना केलं. ‘विरोधी काडी पहिलवान नव्हते’ “जबतक मैं हुँ, वह सपना रहेगा, सपना अगर नहीं रहेगा तो हम भी नहीं रहेंगे. त्यामुळे मी जिकडे जाईन तिकडे मी, पण मी म्हणजे एकटा पक्ष असला पाहिजे. तुम्ही सगळ्यांचं विश्वास संपादन करता. आपले विरोधी तगडे होते. कुणी काडी पहिलवान नव्हते. त्यांचं आव्हान मोडीत काढत तुम्ही केलंत. तुम्ही जबाबदारी पेललीत. पण आता जबाबदारी वाढली आहे. एलआयसीची जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, अशी जाहीरात आहे. त्याच जाहीरातीसारखं माझ्या सेनेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल विश्वास असला पाहिजे की, हर कदम हम आपके साथ है. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपली शिवसेना ही आपल्या बरोबर आहे हा विश्वास तुम्ही देशभर नेला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ( उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर फडणवीसांची मुंबईत पुन्हा मोठी सभा ) “माझं पहिल स्वप्न हे मी फक्त एक असला पाहिजे. ते स्वप्न तुम्ही पूर्ण कराल. आव्हानं येत आहेत. आव्हान आणि नवीन गोष्टी आपल्या देशात बघायला मिळत आहेत. वैयक्तिक जीवनात आणि मोठमोठ्या विमा कंपन्या या कठीण काळामध्ये धावून गेल्या आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी माझा उत्साह वाढवायला चाललो आहे. कारण दमदार वाटचाल सुरु असताना मला सुद्धा जरा हुरुप येतो. कारण मी हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. येत्या 14 तारखेला सभा घेतच आहे. .सवाल जबाब होवू दे जरा. कारण कितीदिवस ऐकत बसायचं. दुसरीबाजूही कळू दे”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.