मुंबई, 6 मे : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकींच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर विविध घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत (Mumbai) पुन्हा एक मोठी सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची 14 मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची याआधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबईच्या सौमय्या मैदानावर सभा झाली होती. त्यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे 14 मे रोजी सभा घेणार आहेत. पण त्यांच्या सभेनंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे आगामी सभेत देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची हिंदुत्ववादाची भूमिका आणि उत्तर भारतीयांच्या मुद्दांवरही महत्त्वाचं भाष्य करणार आहेत. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून या सभेचं आयोजन केलं जात आहे. या सभेला एमएमआरमधील उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस या सभेत राज ठाकरे यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि उत्तर भारतीय मुद्द्यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. कारण राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे. याआधी काही वर्षांपूर्वी त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा घेऊन अनेक उत्तर भारतीयांना आपल्या राज्यात जाण्यासाठी भाग पाडलं होतं. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीयांबद्दल सौम्य भूमिका घेतली होती. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी छठ पूजनच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीय संघटनेच्या मंचावरही दिसले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपल्या आगामी भाषणात राज ठाकरेंबद्दल काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ( नवी मुंबईत पावणे MIDC मध्ये आग, आठ कंपन्यांमध्ये धग, भीषण अग्नितांडव ) गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढल्याचं चित्र आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी जावून भेट घेतल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका अंमलात आणण्याचा निर्धार केला. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन थेट राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. राज ठाकरेंच्या या अल्टिमेटमचे पडसाद उत्तर प्रदेशातही बघायला मिळाले. उत्तर भारतातही अनेक मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यात आल्याची बातमी समोर आली होती. याशिवाय राज ठाकरे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून राज ठाकरेंना विशेष संरक्षण दिलं जाणार आहे. राज ठाकरे यांची सर्व सुविधा उत्तर प्रदेश सरकारडून करण्यात येणार आहे. याशिवाय राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. त्यामुळे या सर्व घडामोडी पाहता भविष्यात भाजप-मनसे युती होईल का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.