मुंबई, 25 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. राज्यात लॉकडाउन कधी उठणार असे सवाल विचारले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाउन कधी आणि कसा उठवणार याबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. तसंच ‘‘लॉकडाऊन उठवा, हे उघडा आणि ते उघडा असे सांगणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत काय? पुनश्च हरिओमचा अर्थ समजून घ्या.’’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या पहिल्या भागात राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. ’ कोरोनासारखं संकट येतं ज्याच्याबाबतीत आपण खबरदारी घेतली नाही तर झपाट्याने लोकं आजारी पडतात आणि मृत्युमुखी पडतात, पण वादळासारखं संकट जसा ‘निसर्ग’ वादळाचा उल्लेख तुम्ही केलात. भूकंप येतो. हे एका क्षणात ज्याला आपण निमिषार्धात म्हणतो…होत्याचं नव्हतं करून टाकतात आणि त्यानंतर आपल्याला फार जिकिरीने जे लोक अशा संकटात अडकले असतील त्यांना सोडवण्याचं काम करावं लागतं. त्यांच्या पुनर्वसनाचे काम करावे लागते. परंतु, त्या वेळेला हे संकट येऊन गेल्यानंतर कुठे काय नुकसान झालंय हे आपल्याला कळतं. जसं आताच ‘निसर्ग’ चक्रीवादळ आलं होतं. त्यावेळी सुदैवाने सुरुवातीपासून आपण काळजी घेतली म्हणून प्राणहानी कमी करू शकलो. अर्थात जेवढी हानी झाली तेवढीसुद्धा खरंतर होता कामा नये. पण हानी आपण कमीतकमी ठेवू शकलो. मर्यादित ठेवू शकलो. तिकडे विजेचे खांब उन्मळून पडले. झाडं, वृक्ष, बागांचे नुकसान झाले. घरांचं नुकसान झालं. शेतीचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई आपण आता करतो आहोत.’ असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
‘कोरोनाच्या संकटाबद्दल मला आधी एक सांगायचंय की, हे कोरोनाचं संकट ते अजूनही संपता संपत नाहीय. मी माझ्या एका फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलंसुद्धा होतं की, ‘सरणार कधी रण…’ हे रण कधी सरणार हेच कळत नाही अजूनही.’ असं स्पष्ट उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच, ‘मुळात हे रणच आहे. रणकंदन आहे. मोठं जागतिक रण आहे. जसं मी मागेच म्हटलं होतं की, वर्ल्डवॉर असून वॉर अगेन्स्ट व्हायरस आहे. हे फार भयानक आहे. हे खरं विश्वयुद्ध आहे. कारण त्याने पूर्ण जग व्यापून टाकलंय. आजसुद्धा ज्यांनी घाईगर्दीने लॉकडाऊन उठवला किंवा सगळं काही संपलं असं समजून लॉकडाऊन उठवला, ते देश आता परत लॉकडाऊन करताहेत. ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घ्या. तुम्ही ऐकलं असेल की, त्यांनी काही भागांत सैन्याला पाचारण केलं.’ असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सैन्याला पाचारण करावं? ‘महाराष्ट्रात सैन्य बोलावण्याची कधीच वेळ आली नव्हती. मधे अशा पद्धतीच्या काही बातम्या आल्या होत्या त्या वेळेला मी असं म्हटलं होतं की, आपण मुंबईत फिल्ड हॉस्पिटल्स केलेत. कारण हे संकट म्हणजे साथ आहे. साथ म्हटल्यावर एका झटक्यात ती कितीजणांना कवेत घेईल सांगता येणार नाही. हे संकट आले तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, बेड्सची कमतरता होती, ऍम्बुलन्सेस नव्हत्या, औषधोपचार नव्हते, व्हेंटिलेटर नव्हते, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर नव्हते. या सगळय़ाची कमतरता का होती, कारण आपल्याकडे आतापर्यंत जी हॉस्पिटल्स आहेत तेवढीच हॉस्पिटल्स होती. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना मार्चमध्ये काही रुग्ण सापडले. ते हळूहळू वाढत असल्याचे लक्षात येताच आपल्याला अधिवेशनसुद्धा एक आठवडा कमी करावं लागलं. त्या वेळी जेव्हा ब्रिफिंग झालं त्या वेळी परिस्थिती किती गंभीर आहे हे मला सांगण्यात आलं. त्याच वेळी मी सांगितलं होतं की, आपल्याला युद्धपातळीवर फिल्ड हॉस्पिटल्स उभी करावी लागतील. त्या वेळेला जर गरज लागली तर मिलिट्रीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्या. ते पटकन अशा पद्धतीने हॉस्पिटल उभं करू शकतात. पण याही बाबतीत आपल्याला लष्कराची मदत लागली नाही. आपण इथल्या इथेही हॉस्पिटल्स उभी केली. मला आपल्या प्रशासनाचा अभिमान आहे की, आपण त्यांना जे काही सांगू त्यानुसार ते तत्परतेने काम करताहेत. म्हणूनच चीनने पंधरा दिवसांत इन्फेक्शन हॉस्पिटल उभं केलं. आपणही पंधरा ते वीस दिवसांत अशी हॉस्पिटल्स उभी केली. आता आपण या हॉस्पिटलमधल्या सुविधा वाढवतोय.’ असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ‘पुनश्च हरिओम’ म्हणतो किंवा ‘मिशन बिगिन अगेन.’ ते करताना नीट विषय समजून घ्यायला हवा की लॉकडाऊन केलेला आहेच. लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढतोय. नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे. लोकांना कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन केलेलं नाही किंवा उघडायचं असं नाही. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण, त्यासाठी एकदम जर घिसाडघाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? म्हणून एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की, कोरोनाचं काय व्हायचं ते होईल, किती माणसे मृत्युमुखी पडतील ती पडतील, पण आम्हाला लॉकडाऊन नको. आहे का तयारी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. ‘अमेरिकेनं केलेही असेल, पण माझी नाही तयारी. मी म्हणजे ट्रम्प नाहीय. मी माझ्या डोळय़ांसमोर माझी माणसं अशी तडफडताना बघू शकत नाही. अजिबात नाही. त्यामुळे एक गोष्ट ठरवा, लॉकडाऊन गेला खड्डय़ात, जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्हाला लॉकडाऊन नको. ठरवता का बोला!’ असंही ठाकरे म्हणाले.

)







