मुंबई, 03 जानेवारी : ‘स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळ्यात मोठा त्याग व बलिदान केले. एखादा तपस्वी व धर्मवीरच असे बलिदान करू शकतो. त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय? असा सवाल करत शिवसेनेनं अजित पवारांची बाजू घेत भाजपला सुनावलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून भाजपने राज्यभरात निदर्शनं केली. याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपला खडेबोल सुनावले आहे. (Sanjay Raut : संजय राऊतांनी जनतेतून निवडणूक लढवून दाखवावी, शिंदे गटाचं चॅलेंज) भाजपपुरस्कृत धुळवड संघटनांनी गदारोळ सुरू केला. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, ‘‘छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.’’ आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही, असं सेनेनं ठणकावून सांगितलं. ‘उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवारांनी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तारतम्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा ‘‘राज्यपाल, तारतम्य बाळगा!’’ असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणाले, तर कुणी ‘इतिहासातील जुने नेते’ म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते? राज्यपालांनी शिवरायांचा अपमान करूनही ते राजभवनाची हवा खात बसले आहेत. राज्यपालांविरुद्ध राज्यात संतापाचा उद्रेक झाला, महाविकास आघाडीने विराट मोर्चा काढला. यावर कोणतेही तारतम्य न बाळगता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘हा नॅनो मोर्चा आहे’ अशी त्याची संभावना केली. वास्तविक, हा मोर्चा शिवरायांच्या अपमानाविरुद्ध होता याचे तारतम्य तरी फडणवीस यांनी बाळगायला हवे होते’ अशी टीका सेनेनं केले. ( ‘युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य’ गुलाबराव पाटलांचं मोठं विधान ) ‘शिवरायांच्या अपमानावर शेपूट घालून बसणारे संभाजीराजांच्या निमित्ताने तारतम्याची भाषा करू लागले आहेत. या मंडळींना संभाजीराजे कळलेच नाहीत. तरुण, स्वाभिमानी संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. अमात्य अण्णाजी पंत दत्तोंच्या कारभारास संभाजी महाराजांचा विरोध होता. अण्णाजी पंतांचा कारभार स्वराज्यासाठी योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरीही शिवाजी महाराजांनी अण्णाजी पंतांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. कारण अण्णाजी हे अनुभवी व कुशल प्रशासक होते, पण संभाजीराजांना ते मान्य नव्हते. त्यामुळे अण्णाजी पंत दत्तो व इतर मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले. अण्णाजींच्या गुप्त इशाऱ्यांमुळे दरबारातील इतर मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. यामागे अण्णाजी पंतांचे कारस्थान होते. संभाजीराजांना स्वराज्यापासून व पित्यापासून तोडण्याचे मोठे कारस्थान त्या काळात रचले गेले. त्या कारस्थानाचे सूत्रधार अण्णाजी पंत होते व त्याच अण्णाजी पंतांचे वारसदार आज महाराष्ट्रविरोधी कारस्थानात सामील आहेत’ अशी टीकाही सेनेनं फडणवीस यांचं नाव न घेता केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.