मुंबई 28 एप्रिल: मुंबई कोरोना व्हायरसने थैमान घातलंय. सरकार युद्धपातळीवर त्याविरुद्ध लढत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्याला विरोधी पक्ष असलेल्या भाजपने प्रतिसादही दिला. मात्र असं असतानाही राजकीय आरोप-प्रत्यारोप अजुनही सुरूच आहेत. युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. तुमचं जाकीट कायमचं निघालं की हा फक्त लॉकडाऊन लूक आहे असं ट्वीट त्यांनी फडणवीसांचं नाव न घेता केलं आहे. मुख्यमंत्री असताना पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे कायम जाकीट घालत असत. त्यांचा तो पेहेराव ही त्यांची एक वेगळी ओळख झाला होता. काळी पॅन्ट, पांढरं शर्ट आणि त्यावर जाकीट असा कायम त्यांचा पेहेराव असायचा. विरोधी पक्ष नेते झाल्यावरही तो कायम होता. मात्र लॉकडाऊन नंतर फडणवीस हे जाकीट न घालता दिसू लागले. घरून व्हिडीओव्दारे दिलेल्या प्रतिक्रिया असोत की राज्यपालांना भेटायला जाणं त्यांनी जाकीट घातल्याचं दिसून आलं नाही. तो धागा पकडत वरूण सरदेसाई यांनी फडवीसांना टोला हाणला आहे. बरं ते जॅकेट permanently उतरले आहे की हा ‘Lockdown Look’ आहे? असं ट्वीट त्यांनी केलंय. यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. हे वाचा - . ..तर कोरोना त्यांच्या जीवावर बेतू शकतो, असं म्हणत राज ठाकरेंनी केली ही मागणी दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार म्हणून नियुक्त करण्याच्या प्रश्नावर पेच निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने त्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवला आहे. मात्र राज्यापालांनी त्यावर निर्णय घेतला नाही. कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यपालांनी त्यांच्या कोट्यातून मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त करावं असा मंत्रिमंडळाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे राजकीय दष्ट्या आरोप-प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्री आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज एकाच कार्यक्रमात होते. हे वाचा - बापरे! मास्क लावला नाही, तर 8 लाख रुपयांचा दंड; कोणत्या देशाने घेतला हा निर्णय? मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश म्हणून दीपांकर दत्ता यांनी आज शपथ घेतली. ते आधी कोलकता उच्च न्यायालयात दुसऱ्या क्रमांकाचे न्यायाधिश होते. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या निवृत्ती नंतर दत्ता यांची मुख्य न्यायाधिश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजभवनात झालेल्या शपधविधी कार्यक्रमाला अतिशय मोजकीच मंडळी उपस्थित होती. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.
या कार्यक्रमात ठाकरे आणि राज्यपालांची अनौपचारिक चर्चा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कुठलीही चर्चा झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.