मुंबई, 10 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं इथलं राज्याचं नेतृत्व कमकुवत आहे, असा याचा अर्थ होतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतल्या आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. संसदेत विरोधकांनी अदानीच्या खिशात एवढा पैसे कुठून आला याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर मोदी द्यायला तयार नाहीत पण ते निवडणूक प्रचारात व्यस्थ आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली. मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. काय म्हणाले संजय राऊत पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं इथलं राज्याचं नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो. यापूर्वी कधी नव्हे इतके पैसे केंद्राकडून राज्याला मिळाले, असं म्हणणं म्हणजे यापूर्वी केंद्र महाराष्ट्राला सूडबुद्धीने वागवत होते हे स्पष्ट होतं. असं करून त्यांनी महाराष्ट्राशी वैर घेतलं आहे. सरकार डबल इंजिनचं असो ट्रिपल किंवा चार इंजिनचं असो. अथवा हवेत उडणारा असो. पण, मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार असणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. राहुल कलाटे यांना शिवसेनेने उमेदवारीचा प्रस्ताव दिला नाही : राऊत राहुल कलाटे यांना शिवसेनेने उमेदवारीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. कलाटे कुठल्या पक्षाकडून उमेदवारी घेणार होते हे मला माहित नाही. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे हे मला तुमच्याकडूनच कळतंय. लोकशाहीत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. वाचा - ‘तर त्यांचा अनादर होईल..’ राहुल कलाटेंनी सांगितलं उमेदवारी कायम ठेवण्याचं कारण कसा होता पंतप्रधान मोदींचा दौरा? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर संध्याकाळी 4.30 वाजता पंतप्रधान अल्जामिया-तुस-सैफियाहच्या भागाचं उद्घाटन करणार आहेत. अल्जामिया-तुस-सैफियाह दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. सैयदाना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनात ही संस्था बोहरा समुदायाच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी या दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आज शुक्रवारपासून सुरू होणार आहे. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत गाड्या सुरू होत आहे. सोलापूरातील धार्मिक स्थळं, कापड उद्योग आणि शिर्डी इथलं साईबाबा मंदिर, पुण्यातील शैक्षणिक केंद्रांपर्यंतचा प्रवास या गाडीमुळे अधिक जलद होणार आहे.