मुंबई, 2 मार्च : शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Shivsena Leader Sanjay Rathod ) यांनी अखेर त्यांच्या मंत्रिपदाचा रविवारी राजीनामा दिला. गेले 20 दिवस राज्यात सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा या राजीनामामुळे खाली बसेल असं दिसत नाही. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या एक दिवस आधी महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनावर आलेलं राजकीय संकट दूर केलं. पण आक्रमक झालेला विरोधी पक्ष आता भरमसाठ वीज बिल, शेतकऱ्याच्या समस्या, कोविड 19 संसर्ग उपाययोजना आणि अर्थ संकल्पावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
वनमंत्री संजय राठोड प्रकरणाची गरम हवा आता राजीनामा घेतल्याने थंड झाली आहे. विरोधी पक्षाने गेले 20 दिवस संजय राठोड प्रकरणाचा पाठपुरावा केला. संजय राठोड यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्षाने सोडली नाही. त्यातच आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाणच्या वडिलांनी संजय राठोड यांना दिलेली क्लिन चिटही संजय राठोडांना वाचवू शकली नाही. कारण संजय राठोड यांनी केलेल्या एकामागोमाक गंभीर चुका त्यांना राजीनाम्यापर्यंत घेऊन गेल्या.
पहिली मोठी चूक म्हणजे विरोधी पक्षाने आरोप केल्यानंतर तब्बल 17 दिवस संजय राठोड अज्ञातवासात गेले. तिथेच त्यांनी त्यांच्या राजकीय वनवासाची तयारी करून ठेवली. त्यांनंतर स्वत: ची भूमीका जाहीर करण्यासाठी बंजारा समाजाची ढाल करत पोहरादेवी गडावर केलेलं शक्ती प्रदर्शन. हे शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा डोकंवर काढणाऱ्या कोविड 19 संसर्गावर उपाययोजना म्हणून जाहीर केलेल्या निर्बंधांना झुगारून संजय राठोड यांनी केलं.
हेही वाचा - दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद, भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिली मोठी जबाबदारी
त्यामुळे अडचणीत सापडलेल्या संजय राठोडांना थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मोठी नाराजी ओढवून घेतली आणि संकटाच्या दरीत स्वत:ला लोटून दिलं. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला, संजय राठोडांना ठाकरेंकडे येण्याचे दरवाजे बंद झाले. सुरुवातीच्या काळात अज्ञातवासात जाणं, थेट ठाकरेंची नाराजी आणि विरोधी पक्षाने आक्रमक केलेला राजकीय हल्ला पचवणं राठोडांना जड गेलं. संजय राठोडांनी त्यांची सर्व राजकीय ताकत पणाला लावत स्वत:ला राजीनाम्यापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्नं केला. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
आता पुन्हा संजय राठोड मंत्रिमंडळात परतणार का, या प्रश्नाचं उत्तर भविष्याच्याच पोटात दडलं आहे. कारण त्यांच्या दिग्रस या विधानसभा मतदार संघातून त्यांना निवडून येताही येईल. तेव्हढी त्यांची राजकीय ताकत आहे. पण एकदा गमावलेली ठाकरेंची मर्जी पुन्हा मिळवणं आणि मंत्रिपद पदरात पाडून घेणं संजय राठोड यांच्यासाठी आव्हानात्म ठरणार, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.