मुंबई, 27 मे : ‘राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही’ अशा शब्दात शिवसेनेनं भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. तसंच, ‘ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असे बोलणार्यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट नसते तर विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते’ असा टोला नारायण राणे यांना लगावण्यात आला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या ‘राजभवनातील तोफा (गंजलेल्या)’ अग्रलेखातून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली. **हेही वाचा -** लॉकडाउन सुरू झाल्यापासून किती लोकं क्वारंटाइन? राज्य सरकारने जाहीर केली आकडेवारी ‘सरकार बनवणारे व सरकार पाडू इच्छिणारे असे सगळेच जण राजभवनाच्या पाहुणचाराचा आनंद घेत असतात. या आनंदास गेल्या काही दिवसात भरते आल्याचे दिसत असेल तर त्यात सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा काय दोष? ते एक सरळमार्गी, नाकासमोर चालणारे एक विचारी सद्गृहस्थ आहेत. ‘संघ विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन आयुष्य वेचणारे ते एक संतमहात्मा आहेत.’ राजभवनात बसून राजकीय काड्या घालण्याचे उद्योग असे संतमहात्मे करतील यावर विश्वास ठेवता येणार नाही. मधल्या काळात राजभवनात पैपाहुण्यांची वर्दळ वाढली आहे व राज्यपालही स्वत: जातीने या पैपाहुण्यांची सरबराई करीत आहेत. हे एक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीलाच साजेसे नाही काय?’ असा टोला विरोधकांना लगावण्यात आला. ’…नाहीतर राज्यपालांना किंमत चुकवावी लागते’ ‘राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्यकारभार चालला आहे की नाही हे पाहण्याचे कार्य भारतीय घटनेने राज्यपालांवर सोपविले आहे. राज्यपालांवरील जबाबदारीबाबत घटनेचा स्पष्ट आदेश आहे. राज्यपालांनी राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागते, असे इतिहासाचे दाखले आहेत’ अशी आठवण करून देत एकाप्रकारे सेनेनं इशाराही दिला. नारायण राणेंना सणसणीत टोला ‘शरद पवार हे ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटले, याचा नको तितका गाजावाजा करून काय साध्य होणार आहे? शरद पवार हे ‘मातोश्री’वर काही पहिल्यांदाच पोहोचलेले नाहीत. पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटी अधूनमधून घडतच असतात. समस्या अशी आहे की, ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असे बोलणार्यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट नसते व सर्व काही आलबेल असते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते’ असा टोला नारायण राणे यांना लगावण्यात आला आहे. ‘राज्यपालांनी विरोधकांचे कान उपटायला हवेत’ विरोधकांचा दृष्टिकोण महाराष्ट्र हिताचा आणि विधायक नाही. विरोधासाठी विरोध हेच धोरण आहे व त्यासाठी राज्यपालांनी विरोधकांना ‘खडेबोल’ सुनवायला हवेत. महाराष्ट्राचे राज्यपाल या बाबतीत सडेतोड आहेत. त्यांना राज्यातले प्रशासकीय नेमणुकांचे अधिकार हवे आहेत. ते शेवटी देशाची घटना दुरुस्त करूनच मिळवावे लागतील, पण सध्या जे अधिकार त्यांच्या हाती आहेत त्यांचा वापर करून त्यांनी राज्य अस्थिर करू पाहणार्या विरोधकांना राजभवनावर बोलवायला हवे आणि त्यांचे कान उपटायला हवेत’ अशी मागणीही सेनेनं केली. हेही वाचा - इंडिगो-एअर इंडिया विमानातील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह, शेकडो प्रवासी क्वारंटाइन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.