'योगी महाराजांचे बरे चालले', साधू हत्येवरून शिवसेनेचा फडणवीस-शहांना टोला

'योगी महाराजांचे बरे चालले', साधू हत्येवरून शिवसेनेचा फडणवीस-शहांना टोला

बुलंदशहर ते इटावापर्यंत हत्या होऊनही कोणी तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. राज्यपालांच्या घरात बसून अखंड ठिय्या मांडला नाही.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि वाहनचालकाची जमावाने ठेचून हत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच उत्तरप्रदेशमध्ये 2 साधूंची मंदिरात हत्या करण्यात आली. या प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आजच्या 'सामना'मध्येही या प्रकरणावरुन 'महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही' असं म्हणत योगी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

'राजकीय मनाचा गुंता! नवा साधू वाद!' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या लेखात राज्यातील भाजपचे नेते आणि योगी आदित्यनाथ सरकारवर सामनातून सडकून टीका करण्यात आली आहे.

'पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही. राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गंमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे' असा टोला योगी आदित्यनाथ यांना लगावण्यात आला आहे.

काय लिहिलंय आजच्या 'सामना'त?

'उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक साधू आहेत. त्यांच्या साधुत्वाचा आम्ही नेहमीच आदर केला. महाराष्ट्रात मध्यंतरी दोन साधूंची हत्या जमावाने केली ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी बाब आहे. ज्या गावात ही हत्या झाली ते संपूर्ण गाव भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अधिपत्याखाली बऱ्याच वर्षांपासून आहे. या प्रसंगावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. भगव्या वस्त्रातील साधूंची हत्या होणे ठीक नाही, ही त्यांची चिंता समजण्यासारखी आहे.

हेही वाचा - 3 मेनंतर 'या' परिसरात मिळणार सूट, गृह मंत्रालयानं दिले संकेत

साधूंचे मन साधूच जाणतो हे खरे, पण पुढच्या दहा दिवसांतच योगी महाराजांच्या राज्यातच बुलंदशहरमधील देवळातच दोन साधू महाराजांची हत्या झाली. महाराष्ट्रातील साधूंचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला, तर योगांच्या राज्यात साधूंना गळे चिरून मारले. या साधूंच्या हत्येवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन केला व चिंता व्यक्त केली. असे प्रसंग राजकारण करण्याचे नसून गुन्हेगारांना एकत्रित येऊन धडा शिकविण्याचे आहेत. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, गुन्हेगारांना कठोर शासन तुम्ही करालच, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एका कळकळीने सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना

आहे. यात कसले आलेय डोंबलाचे राजकारण! पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन करून चिंता व्यक्त केली यातही काही लोकांना फक्त राजकारणाचाच वास येत आहे' अशी टीका करण्यात आली.

'भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ'

'बुलंदशहरातील घटना वेगळी व महाराष्ट्रातील वेगळी, तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधाने योगी महाराजांच्या कार्यालयातून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की, चिंतेचा माहोल निर्माण केला जातो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला जातो. पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगव्या-भगव्यात व रक्ता-रक्तात फरक करणारे हे मानवी मन गंमतीचेच आहे, असे आम्ही म्हणतो ते यासाठीच' असा टोलाही योगी आदित्यनाथ आणि भाजपला लगावण्यात आला.

हेही वाचा - मालेगावात कोरोनाचं थैमान,3 महिन्यांच्या चिमुकलीसह 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

अमित शहा आणि फडणवीसांना टोला

बुलंदशहरात जे घडले, त्याआधी दोनेक दिवस इटावा येथे एका ब्राह्मण कुटुंबात पाच जणांची हत्या झाली व त्यातील काहीजण धार्मिक विधी, पूजाअर्चा करून उदरनिर्वाह करणारे होते. म्हणजे तेही एकप्रकारे गरीब साधूच होते, पण बुलंदशहर ते इटावापर्यंत हत्या होऊनही कोणी तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही. राज्यपालांच्या घरात बसून अखंड ठिय्या मांडला नाही. शहरी नक्षलवाद्यांचा हा सर्व हैदोस असून सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा इंटरपोलकडे द्यावा, अशी मागणी केली नाही. दिल्लीतून खास हालचाली झाल्या व साधू हत्येबाबत माहिती मागवून राष्ट्रीय गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली, अशी बातमी आमच्या वाचनात आली नाही, असा टोलाही लगावण्यात आला.

संपादन - सचिन साळवे

First published: April 30, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या