मुंबई, 21 जुलै : यंदा मनसेने धुमधडाक्यात दहीहंडी साजरा करणार असल्याचा निर्धार केल्याचं दिसत आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी फेसबुकवरुन तशी पोस्ट शेअर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यात अनेक सण-उत्सवांवर गंडांतर आलं आहे. अद्याप देशाला तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे अद्याप सर्व सुरळित करण्यात आलेलं नाही.
दरम्यान मनसेच्या निर्धारावर शिवसेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत शिवसेना प्रवक्ता सचिन अहिर म्हणाले की, दहिहंडीची सर्वपक्षीय बैठक झाली आहे. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रतिकात्मक गणेश उत्सव याबरोबरच वारी देखील खुप चांगली झाली. कोणी जर काही राजकारण करत असेल तर योग्य नाही. दोन डोस झाले असतील तर परवानगी द्या असं म्हणत असतील तर हे कोण कसं ठरवणार? प्रत्यक्षपणे हे ठरवणं शक्य होणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
हिंदुंत्वाची भाषा आम्हाला कोणी शिकवू नये. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भावना ही शिवसेनेची राहिली आहे. कोणाला काय राजकीय आरोप करायचे असतील ते करू द्या. सर्वांनी सहकार्य कराव ही अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता सचिन आहिर यांची मनसेच्या भूमिकेवर दिली आहे.
हे ही वाचा-"पेगॅससचा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर" सामनातून केंद्रावर निशाणा
त्यापुढे जाऊन कोरोनाच्या आरोपांवर ते म्हणाले की, ऑक्सीजनची गरज असताना कुठलीही कंपनी पुढे येत नव्हती. नियमानुसारच कंत्राट स्थायी समितीत देण्यात आली. तिथं भाजपचेही नगरसेवक होते, त्यांनी का तेव्हा प्रश्न विचारला नाही. त्यांचे मेंबर झोपले होते का ? कुणाला टेंडर मिळाले नाही म्हणून ही धावपळ सुरू आहे का ? काही अयोग्य होत असेल तर आम्हाला कळवा. प्रश्न उपस्थित करायचा होता तर मग स्थायी समितीत का उपस्थित केला नाही. काम केले नसेल तर संबधित कंपनीला दंड केलाही जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, MNS, Shivsena