मुंबई, 22 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे. शिवसेनेच्या 45 पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आता शेवटचा घटका मोजत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे (Shiv Sena) जवळचे कट्टर कार्यकर्ते आणि माहिम-दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे देखील नॉट रिचेबल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते देखील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. याशिवाय शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेले नेते आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून शामील झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार कालपर्यंत सुरतच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर आज पहाटे त्यांचं एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेलं गेलं. या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था ही गुवाहाटीमधील ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. यामध्ये गुलाबराव पाटील हे देखील आहेत. गुलाबराव हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ( वर्षाचा कर्मचारी हात जोडून मुख्यमंत्र्यांसमोर उभाच राहीला, भावुक करणारा तो Video ) दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाबराव हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन हॉटेलमध्ये दाखल झाल्याचा दावा केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. याच ऑफरची माहिती देण्यासाठी गुलाबराव गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये गेले आहेत. पण गुलाबराव यांचा त्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गुलाबराव जेव्हा एकनाथ शिंदे यांना भेटतात तेव्हा ते त्यांचा पाया पडताना दिसत आहेत. त्यामुळे गुलाबरावही शिंदेंच्या गोटात सहभागी झाले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेनेचा ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा Exclusive VIDEO समोर #GulabraoPatil #ShivsenaMLA #Shivsena pic.twitter.com/nFq353P5kF
— News18Lokmat (@News18lokmat) June 22, 2022
दुसरीकडे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर हे नॉट रिचेबल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते देखील पहाटोपर्यंत गुवाहाटीला दाखल होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे सर्वच आमदार शिंदे यांच्या गोटात गेले तर मग महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात हे सरकार कोसळतं की अबाधित राहतं ते येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया काही नेत्यांकडून दिली जात आहे.

)








