मुंबई, 15 जुलै : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात संत्तातर होऊन शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन झालं आहे. तर पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना असा वाद सुरू झाला आहे. ठाकरे सरकार पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत आता पक्ष पुन्हा नव्याने उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील राज्यभरात दौरा सुरू करणार आहेत. शिंदे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना आता तयारी करत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधान परीषद विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावं यासाठी मागणी केली आहे. आमच्याकडे बहुमत, विधान परीषद विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावं : शिवसेना शिवसेनेने आता विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी आता त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. विधान परीषदेत विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेने विधान परीषद उपाध्यक्षांना लिहलं आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीतील तीनही पक्षामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 13 आमदार असल्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळावं. त्यासाठी शिवसेनेने विधान परिषद उपाध्यक्ष निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं आहे.
विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. राष्ट्रवादीमधून विरोधी पक्षनेतेपदी (Leader of the Opposition in the Assembly) कुणाची निवड होणार अशी चर्चा रंगली होती. अखेरीस राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas aaghadi government) अजित पवार यांचा दबदबा होता. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दोन्ही महत्वाची पदे अजित पवार यांच्याकडे होती. तसेच राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा खरंतर ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखला जातो. विधानसभेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे 53 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 55 आमदार असले तरी बंडखोरीमुळे 39 आमदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून अजित पवार नवे विरोधी पक्षनेते म्हणून आगामी काळात कार्यरत राहणार आहेत.