ठाणे, 14 जुलै : शिवसेनेला वारंवार एकामागे एक झटके लागत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर अनेक पदाधिकारी शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून आपल्या नेतृत्वात असलेली शिवसेनाच खरी असल्याचा दावा केला जातोय. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे शिंदे गटाला राज्यभरातून चांगली साथ मिळत आहे. तरीही काही कट्टर शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं मानलं जात आहे. या सर्व घडामोडींदरम्यान मुख्य शिवसेनेला झटका देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा झटका आहे. गोपाळ लांडगे यांचं कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलं प्रभुत्व आहे. त्यांनी शिंदे सेनेला साथ दिल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा त्याग करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक विशाल पावशे, माजी नगरसेवक प्रशांत काळे यांनी देखील यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. तर उल्हासनगरचे माजी नगरसेवक कलवंत सिंह आणि माजी नगरसेवक अरुण आशन यांनी देखील शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमधील शिंदे गटाची ताकद वाढली आहे. उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना महत्त्वाचे आदेश दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असलं तरी या जखमेवर मात करुन पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्याचा संकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे प्रचंड कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे दररोज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाने नुकतंच नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या नगर परिषदेच्या निवडणुकींमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक जागा जिंकून याव्यात यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व जिल्हा प्रमुखांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे पाऊस नसेल तर आपण स्वत: नगर परिषदेच्या प्रचारात सभेसाठी येवू, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. ( ‘मातोश्रीचं पूर्वीचं वजन संपलं, याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार’, मनसेची खोचक टीका ) शिवसेना नगरपरिषदांच्या निवडणुका ताकदीने आणि स्वबळावर लढवणार आहे. उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबतच्या बैठकीत याबाबतचं वक्तव्य केलं. सत्तेत असताना केलेली कामे जनतेच्या समोर मांडा. पक्षाच्या भूमिका लोकांपर्यंत घेऊन जा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना दिल्या. तसेच पाऊस नसेल तर मी स्वत: सभेसाठी येईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. लढाईला तयार राहा. कुणी गेले आहे, याचा विचार न करता या निवडणुकीत शिवसेना मजूबत असल्याचे दाखवून द्या. आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. तळागाळात जावून लोकांची कामे करा. मुंबईत ज्याप्रमाणे पक्ष काम करतोयत्याप्रमाणे राज्यातही कामे करा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.