...तर शरद पवार काँग्रेसच्या नेतपदी बहुमताने निवडून आले असते, शिवसेनेचा खुलासा

...तर शरद पवार काँग्रेसच्या नेतपदी बहुमताने निवडून आले असते, शिवसेनेचा खुलासा

'80 वर्षांचे होऊनही शरद पवार (Sharad pawar 80th Birthday) यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. 'दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता.'

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर :  '80 वर्षांचे होऊनही शरद पवार (Sharad pawar 80th Birthday) यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो' अशी स्तुतीसुमनं उधळत शिवसेनेनं (Shivsena) शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसंच नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला नाहीतर पवार तेव्हाच बहुमताने निवडून आले असते, अशी खंतही सेनेनं बोलून दाखवली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

'‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. 80 व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे 80 वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत.' असं म्हणत सेनेनं बाळासाहेब ठाकरे आणि  शरद पवार यांच्या मैत्रीला उजाळा दिला.

'शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. पवारांच्या चातुर्यानेच वाजपेयींचे सरकार एका मताने पडले, पण संसदेतील या नेत्यास विश्वासात न घेता सोनिया गांधी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या त्या अस्वस्थतेतून वैचारिक मुद्द्यांवर काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले. नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यागून पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात पूर्ण तयारीनेच उतरले. राजीव गांधींच्या हत्येने गांधी परिवार राजकारणातून बाहेर पडलेला, काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, दुर्बल झालेला, संसदीय काँग्रेस पक्षात तेव्हा मतदान झाले असते तर पवार नेतेपदी बहुमताने निवडून आले असते, पण वानप्रस्थाश्रमात निघालेल्या नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला' अशी खंतही सेनेनं बोलून दाखवली.

'दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची नेहमीच भीती वाटत आली. पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली. पवारांवर कायम संशय घेण्यात ज्यांनी धन्यता मानली ते पावसाळ्यातील गांडुळांप्रमाणे राजकारणातून नामशेष झाले. त्यांना आपले जिल्हेही सांभाळता आले नाहीत. पवार उद्योगपतींना मदत करतात असा आरोप केला जातो. उद्योगपती नसतील तर राज्याची प्रगती कशी होणार? याचे उत्तर कोणीच देत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईत येतात व उद्योगपतींना भेटतात, ‘उत्तर प्रदेशात चला’ असे आमंत्रण देतात ते कशासाठी?   पवार यांनी उद्योगपतींना मोठे केले तसे शेतकरी आणि सहकार क्षेत्रासही बळ दिले. खासगीकरणाचा जोरदार पुरस्कार पवार करीत राहिले. खासगी क्षेत्रातून त्यांनी ‘लवासा’सारखी सौंदर्यस्थळे निर्माण केली, पर्यटन उद्योगास बळ दिले. त्यातून रोजगार व महसूल निर्माण केला. तेव्हा व्यक्तिद्वेषाने पछाडलेल्या राजकारण्यांनी हे प्रकल्पच मोडीत काढून महाराष्ट्राचे नुकसान केले. ‘लवासा’सारखे प्रकल्प इतर राज्यांत निर्माण झाले असते तर महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले असते, पण देशातल्या राजकारण्यांनी अनेक वर्षे फक्त ‘पवार विरोध’ हेच राजकारण केले.' असं म्हणत पवार यांनी विरोधकांवर टीकाही केली.

'महाराष्ट्रात पवार विरोधकांना वेळोवेळी महत्त्वाची पदे वाटली गेली. पवार विरोधावर काँग्रेस पक्षातील तीन पिढ्या जगल्या हे कसले लक्षण मानायचे? हीसुद्धा पवारांची ताकदच म्हणायला हवी. देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत. पवार 80 वर्षांचे होत आहेत त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत. साताऱ्याच्या भरपावसातील सभेत विजेचा कडकडाट व्हावा तसे शरद पवार अवतरले. त्यांनी लहानसेच भाषण केले. त्या पावसाळी छायाचित्राने महाराष्ट्रात विजेचा संचार झाला. त्या सभेने त्यांच्या नेतृत्वाचा कसदार कंगोरा पुन्हा समोर आला. कोरोनाचे संकट, त्यातून लादलेले माणसांतील अंतर हे सर्व असूनही माणसे पवारांकडे खेचली जातात याचे संशोधन त्यांच्या विरोधकांनी करायचे. त्यांचे राजकीय शत्रू आपल्या कर्मानेच संपले. आता उरले ते अगणित चाहते' असं म्हणत सेनेनं विरोधकांना खडेबोल सुनावले आहे.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2020, 8:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading