मुंबई, 25 मार्च : काल (शुक्रवार 24 मार्च) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे सदस्यत्व देखील धोक्यात आले आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय विधानसभा हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली होती. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे. खासदार संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत गेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यसभा संजय राऊत यांच्या हक्कभंग प्रस्तावावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राहुल गांधी यांच्यानंतर संजय राऊत यांचीही खासदारकी जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे. संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय? सध्याचं विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी 1 मार्च रोजी कोल्हापुरात माध्यमांना दिली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा हा अपमान असल्याचा आरोप यावरून करण्यात आला. याच वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. वाचा - ‘बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं’, मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाला फटकारलं हक्कभंग म्हणजे नेमकं काय? लोकशाही व्यवस्थेत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात. त्यांना कोणत्याही अडचणींविना काम करता यावे, यासाठी राज्यघटनेतील कलम 105 आणि कलम 194 अन्वये विशेष अधिकार अर्थात हक्क बहाल करण्यात आले आहेत. या हक्कांना बाधा निर्माण होईल असे वर्तन करण्याची परवानगी कोणत्याही व्यक्तीला किंवा समूहाला नाही. आमदारांनी विधानसभेत जे विचार मांडले, त्याविरोधात बाहेर जाऊन कोणत्याही व्यक्तीला गैरवक्तव्य करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत यांनी आमदारांच्या याच विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला जात आहे.
राहुल गांधी यांचं प्रकरण काय? राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर टीका करताना मोदी या आडनावावरुन टिप्पणी केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात निकाल देताना सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

)







