मुंबई, 8 एप्रिल: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत सचिन वाझे (Sachin Vaze) अटक प्रकरण आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी लिहिलेल्या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) जोरदार टीका केली. इतकेच नाही तर प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. यानंतर आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश जावडेकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जावडेकरांना हे शोभत नाही
प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार आहे. त्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल नवा शब्दकोष तयार केला असेल. तसे मोदी यांच्या सरकारला लोक अनेक शब्द प्रयोग वारतात. असे शब्द वापरल्याने मोदींचे सरकार हे फेकू सरकार आहे हे सिद्ध होत नाही. जावडेकरांना काही माहिती नाही, ते फक्त दिल्लीत पत्रकार परिषद घेतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या सरकारवर घाणेरडी टीका करणे पुणेकर जावडेकरांना शोभत नाही.
हे पण वाचा: सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरेंनी तात्काळ राजीनामा द्यावा : प्रकाश जावडेकर
SCने अनिल देशमुखांची याचिका फेटाळल्यावर राऊतांची प्रतिक्रिया
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांनतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. यावर संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की गृहमंत्री पदावरील व्यक्तीचा तपास CBI ने करावा, तसा निकाल दिला असेल तर तो स्वीकारायला हवा. राज्य सरकरला न्यायालयाच्या आदेशाचे नेहमी पालन करावे लागते. शेवटी बाजू ही न्यायालयासमोर मांडायची असते. हा एक अधिकार आहे. बाजू ऐकून घेण्यासाठी न्यायाधीश बसले असतात. पण न्यायालयाला वाटलं असावे की देशमुखांना बाजूच नाही.
हे पण वाचा: आरोप अत्यंत गंभीर, CBI चौकशीची गरज; सुप्रीम कोर्टात अनिल देशमुखांना मोठा धक्का
जयंत पाटील म्हणाले ते सत्य
अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला आहे. त्यामुळे चौकशीतून ते तावून सुलाखून निघतील. त्यामुळे ते चौकशीनंतर मंत्रीमंडळात परत येतील हे जयंत पाटील म्हणाले ते सत्य आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्याच्या जीवाशी तुम्ही खेळत आहेत का ?
राज्यात निर्माण झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यावर संजय राऊत म्हणाले, राज्याचे सरकार उत्तम चाललं आहे. तुम्ही अडथळे, संकटे उभी करीत आहात. लशींचा पुरवठा कमी करून तुम्ही महाराष्ट्राच्या जीवाशी खेळत आहेत का ? जावडेकर यांनी त्याचे उत्तर द्यावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Prakash javadekar, Sanjay raut