नवी दिल्ली, 8 एप्रिल: मुंबईत स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्या प्रकरणात सचिन वाझेला (Sachin Vaze) अटक करण्यात आली त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचं म्हटलं. या घटनेने संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर या संपूर्ण प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्लाबोल केला आहे.
शिवसेना आणि सचिन वाझे यांचा संबंध काय?
या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी शिवसेना आणि सचिन वाझे यांच्यात संबंंध काय आहे असा सवालही उपस्थित केला. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप्स सुद्धा प्ले करुन दाखवल्या. या क्लिप्समध्ये संजय राऊत हे सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं सागंत आहे तर सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? असा प्रश्न उपस्थित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसत आहेत.
हे पण वाचा: ...तर शिवसेना पक्षप्रमुख मला फासावर लटकवतील, अनिल परब संतापले
... म्हणून शिवसेनेकडून सचिन वाझेचं समर्थन
सचिन वाझे खरं बोलू नये म्हणून अटक केल्यानंतरही त्याचं समर्थन शिवसेनेचे नेते करत होते. त्यानंतर सचिन वाझे याचं पत्र आलं. त्या पत्रात म्हटलं, 1650 बार आणि रेस्टॉरंटकडून तीन-तीन कोटी वसुल करण्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं. वाझे याला नोकरीवरुन काढण्यात येऊ नये म्हणून दोन कोटी मागितले. अनिल परब यांच्या संदर्भात म्हटलयं की, मुंबईतील भेंडी बाजार येथे एक पुनर्विकास योजना सुरू आहे आणि त्या योजनेच्या तक्रार करणाऱ्या ट्रस्टींना बोलावून त्या तक्रारीच्या आधारे 50 कोटी मागितल्याचं पत्रात म्हटलं आहे. वसुली शिवाय यात काही नाहीये.
किमान समान कार्यक्रम नेमका काय?
अनिल परब यांच्यावर आरोप करताच संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे गप्प बसले. शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम नेमका आहे तरी काय?
हे पण वाचा: Sachin Vaze कडून पत्रात उल्लेख झाल्यानंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया
महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
निवडणुकीत विजय मिळवून हे सरकार आलेलं नाहीये. निवडणुकीत मतदारांनी यांना विजय मिळवून दिलेला नाहीये. मोदींच्या फोटोवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आणि नंतर गद्दारी करत इतरांशी हात मिळवला. कारण, या तिन्ही पक्षांचा कार्यक्रम एकच होता की लूट करा आणि लूट करण्यासाठीच हे सर्व सुरू आहे. यामुळेच मी मागणी करतो महाराष्ट्राच्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाहीये त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे खरं तर महावसुली सरकार
हे मागच्या दाराने आलेलं सरकार आहे
सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा
पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला
आम्ही जगातील सर्व काही पाहिलं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रथमच पाहिलं
ज्या व्यक्तीची गाडी होती त्याची हत्या करण्यात आली
दरम्यान परमबीर सिंग यांचे पत्र समोर येतं
सचिन वाझे आणि शिवसेनेचे नाते काय? प्रकाश जावडेकरांनी उपस्थित केला प्रश्न
पोलिसांकडून वसुली करा, लूट करा आणि वाटून घ्या... म्हणूनच तिन्ही पक्ष एकत्र आहेत
महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम आहे तरी काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.