मुंबई, 09 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. भाजपने थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत बेछुट आरोप केले. त्यांच्या या आरोपावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सवाल करत सडकून टीका केली आहे. 'दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? ' असा थेट सवाल राऊतांनी विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.
'गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?' असा सवाल करत राऊतांनी भाजपला सणसणीत टोला लगावला.
'सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला. दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? हा पहिला प्रश्न. स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत खुलासा केला. तरीही शंका असतील तर त्यासाठी काही वृत्तवाहिन्यांना हाताशी पकडून बदनामी मोहीम राबवणे हा मार्ग आहे काय? असा थेट सवाल भाजपला केला आहे.
बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे
'सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत बिहार पोलिसांना टोलाही लगावला.
'बिहारचे राज्य पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे भाजपचे उमेदवार'
'बिहारचे राज्य पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी वृत्तवाहिन्यांवर खाकी वर्दीत जाऊन तावातावात बोलतात. वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते सहभागी होतात. हा सरळसरळ पोलिसी शिस्तभंग आहे. पुन्हा या गुप्तेश्वर पांडे यांच्याकडून शिस्त पाळण्याची अपेक्षा तरी का करावी? हे गुप्तेश्वर पांडे कोण? 2009 साली ते डीआयजी असताना पोलीस सेवेचा राजीनामा देऊन थेट राजकारणात उतरले. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ‘बक्सर’ मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले. पण भाजपचे खासदार लालमुनी चौबे यांनी बंडखोरी करण्याची धमकी देताच चौबे यांचीच उमेदवारी पुन्हा कायम ठेवली. त्यामुळे गुप्तेश्वर पांडे हे मधल्या मध्ये लटकले. ‘ना घर के ना घाट के’ अशी त्यांची अवस्था झाली. अशा तऱ्हेने राजकारणात घुसण्याचे त्यांचे मिशन फेल गेले. त्यानंतर त्यांनी पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी अर्ज विनंत्या केल्या. असे सांगतात की, गुप्तेश्वर पांडे यांच्या पत्नीनेही पतीच्या वतीने सरकारकडे अर्ज केला व नोकरी सोडताना आपले पती गुप्तेश्वर पांडे यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती, असे सांगितले. मानसिक स्थिती चांगली नव्हती याच आधारावर त्यांना पुन्हा सेवेत घेतले असेल तर तो बिहार सरकारचा प्रश्न. पांडे हे तेव्हा भाजपच्या तंबूत होते व आज नितीश कुमार यांचे खास आहेत. भाजपकडून उमेदवारी स्वीकारलेले पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे हास्यास्पद आहे' असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला.
'या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत व इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे' असा थेट आरोपही राऊत यांनी केला.
'सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूआधी त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी. पण राजकीय पुढारी दोन आत्महत्यांचा धागा जुळवत आहेत. दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिला इमारतीवरून फेकले, असा आरोप भाजपचे एक पुढारी करतात तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाचा थोडाही विचार केलेला दिसत नाही. दिशा सॅलियनच्या वडिलांनी एक पत्र लिहून याबाबत खंत व्यक्त केली. मृत्यूनंतर माझ्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी का करता, हा तिच्या माता-पित्यांचा सरळ प्रश्न आहे. दिशा सॅलियन हिचे संपूर्ण कुटुंबच या बदनामीमुळे मानसिकदृष्टय़ा खचले आहे. तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले असे आता समोर आले' असंही राऊत म्हणाले.