मुंबई, 17 डिसेंबर : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा ड्रग प्रकरणात सापडला आणि मोठी खळबळ उडाली. ही कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचं नाव प्रकाशात आलं,अनेक खबळजनक घडामोडी घडायला सुरुवात झाली आणि या प्रकरणात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उडी घेतली. त्यांनी थेट कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर बोट ठेवलं आणि समीर वानखेडे जातीनं खरा कोण ? हा भलताच प्रश्न समोर आला. आरोपांची राळ उठवत मलिक यांनी अनेक पुरावे उघड करायला सुरुवात केली. यानंतर आर्यन खान ड्रग प्रकरणच संशयाच्या भोवऱ्यात सापडलं.
सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आणि समीर वानखेडे खरा कोण ? नवबौद्ध अर्थात हिंदू महार का मुसलमान ? हा वाद सुरू झाला. न्यूज 18 लोकमतनं सुरू केला या प्रकरणाचा पाठपुरावा आणि अनेक धक्कादायक माहिती समोर आली. चक्क एकाच व्यक्तीचे हिंदू आणि मुस्लिम... या दोन्ही धर्माचे पुरावे समोर आले आणि चक्क हे दोन्ही पुरावे सरकारच्या रेकॉर्डवर असल्याचं समोर आलं. आता अनेक सरकारी यंत्रणा कामाला लागल्या. समीर वानखेडे यांची खरी जात कोणती ? हे शोधण्याचं मोठं आव्हान या यंत्रणांना आहे. न्यूज 18 लोकमतनं हे उजेडात आणण्याचा निर्णय घेतला.
नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ
असं म्हणतात की, जात नाही तिला जात म्हणतात. कारण जो जन्माला येतो त्याची त्या वेळी जी जात असेल तीच मरेपर्यंत कायम असते. तसं आपल्या संविधानानं, मात्र धर्म बदल करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलाय. मात्र त्याची जात काही बदलत नाही. पण जर धर्म बदल केल्यानंतर त्या व्यक्तीला झालेलं मूल हे कोणत्या जातीचं ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कारण सध्या गाजत असलेलं एक वादग्रस्त प्रकरण. एनसीबी संचालक समीर वानखेडे हे हिंदू महार नाही तर मुस्लीम असल्याचा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेला आरोप. समीर वडील ज्ञानदेव का दाऊद ? या उपस्थित केलेला सवाल ? जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचा, आरोप मलिक यांनी केला आणि मोठी खळबळ उडाली.
वाचा : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, बार परवानाप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारणे दाखवा नोटीस
एकाच व्यक्तीचे चक्क 2 धर्म, खरा धर्म कोणता ?
समीर वानखेडे खरा कोण ? समीर दाऊद वानखेडे का समीर ज्ञानदेव वानखेडे ? ज्ञानदेव वानखेडे हे दाऊद वानखेडे कसे ? आज सरकारी रेकॉर्डवर, समीर हिंदू महारजन्म झाला. वडील हिंदू का मुसलमान ? काय म्हणताय सरकारी कागद ?अनेक सरकारी यंत्रणा तपास करतायत, धक्कादायक गोष्टी उघड होतायत. समीरचा जन्म झाला तेव्हाच्या कागदावर समीर मुसलमा नंतर सरकारी नोकरी कागदावर समीर नवबौद्ध. एकाच व्यक्तीचे चक्क 2 धर्म, समीरचा खरा धर्म कोणता ?
बीएमसीचा सावळा गोंधळ
आम्ही याच गोष्टींचा पाठपुरावा सुरु केला आणि हाती लागलं समीर वानखेडे याचं 1995चं कास्ट सर्टिफिकेट... हा सरकारी कगदानं, समीर हिंदू महार असल्याचं स्पष्ट झालं. 2008 लाही याच कार्यालयानं, समीर हिंदू महार असल्याचा हाच दाखला पुन्हा दिला. कुटुंबांचा हिंदू महार असल्याच्या इतिहासावर आधारीत ठरत असतं हे जात प्रमाणपत्र... मात्र या कागदांचा खरा आधार असतो, तो म्हणजे जन्म पुरावा. याचमुळं बीएमसी अर्थात मुंबई महापालिकेचं रेकॉर्ड काय म्हणतंय ? हा प्रश्न उपस्थित झाला. थेट बीएमसी गाठण्याचा निर्णय घेतला आणि या जागी बीएमसीच्या सावळा गोंधळाचा असाही एक पुरावा हाती लागला.
दिनांक 22 मे 1993 वॉर्ड क्रमांक 7709 नाव समीर ज्ञानदेव वानखेडे अर्थात हिंदू महार मात्र, समीरच्या आई-वडीलांच्या राष्ट्रीयत्वावर थेट प्रश्नचिन्ह. आता हा गोंधळ की बीएमसी कर्मचाऱ्यांची चूक ?
वाचा : 'समीर वानखेडे अल्पवयीन असताना त्यांना दारुच्या दुकानाचा परवाना' मलिकांचा खळबळजनक आरोप
धक्कादायक पुरावा
समीरच्या वडिलांचं नाव दाऊद नाही तर ज्ञानदेव असल्याचे पुरावे. बीएमसीच्या वेळोवेळी दिलेल्या अनेक दाखल्यांवर दिसून येताय. मात्र, जोपर्यंत समीरच्या जन्माची नोंद सापडत नाही तोपर्यंत शोध सुरूच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हाती लागला हा धक्कादायक पुरावा.
दिनांक 14 डिसेंबर 1979 समीरचा जन्म झाला तीच तारीख वॉर्ड क्रमांक 7709 समीरच्या वडिलांचं नाव दाऊद के वानखेडे आईचं नाव झायेदाबी असल्याचा स्पष्ट उल्लेख याच कागदावर समीरचंही नावयाच कागदावर एका बाजूला ज्ञानदेव कचरू वानखेडे म्हणूनही नोंद जन्माला आला तेव्हाचा हा पुरावायाच कागदावर, समीर मुस्लीम असल्याची नोंद.
कायदा असं म्हणतो की कोणतीही व्यक्ती जन्माला येते, तेव्हा त्याच्या वडिलांचा असलेला धर्म, असलेली जात, हीच त्यालाही लागू होते. जर हा आधार मान्य केला तर समीर वानखेडे हा जन्मानं, मुस्लिम असल्याचं स्पष्ट होतंय.
अर्थात ही नोंद करणाऱ्या व्यक्तीकडेच याचं खरं उत्तर असू शकतं. म्हणूनच आम्ही गाठलं थेट समीरच्या वडिलांना, अर्थात ज्ञानदेव कचरू वानखेडे यांना. कारण प्रश्न अनेक होते. कोण आहेत समीरचे वडील ? दाऊद की ज्ञानदेव ? या प्रश्नाच्या उत्तरातच होती अनेक उत्तरं.
वाचा : समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढणार? जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरू
कायदा काय म्हणतोय ?
आज जरी समीरच्या वडिलांचं नाव सर्व सरकारी कागदावर ज्ञानदेव असलं तरी त्यांचं नाव दाऊद असल्याचा आरोप अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय, त्यातच कायदा काय म्हणतोय ? विशेष तपास यंत्रणांच्या हाती काय लागलंय ? सेक्शन 4ची नवीन अमेडमेन्ट काय आहे ?
समीर वानखेडे खरा कोण ? हिंदू की मुसलमान ? समीरचे वडील कोण ? ज्ञानदेव की दाऊद ? या प्रश्नानं सध्या अनेक सरकारी यंत्रणांना कामाला लावलंय. कोर्टात अनेक वेगवेगळे दावे दाखल झालेय. अर्थात न्यायालयानं याची गंभीर दखल घेतल्यानं, या प्रकरणाचं गांभीर्यही वाढलंय. मुंबईच्या ओल्ड कस्टम हाऊस अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेकॉर्डमध्ये लपलेली या प्रश्नांची उत्तरं शोधणं, हे एक मोठं आव्हान समोर आलंय. जसं जन्माला आलेल्या बाळाच्या कागदपत्रांना खरा आधार म्हणजे महापालिकेचं रेकॉर्ड हे अंतिम असल्याचं कायदा मानतो, तसंच जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेलं जात प्रमाणपत्र, हे प्रमाण मानलं जातं.
मुंबईच्या याच सरकारी कार्यालयानं तब्बल 2 वेळा, समीरला हिंदू महार प्रमाणित केलेलं. अधिकृत जात प्रमाणपत्र दिलंय. मात्र त्याचा आधार शोधण्याचं काम आता सरकारी यंत्रणा करताय. पाहुयात, कोणकोणत्या यंत्रणा कामाला लागलाय ते...
दक्षता पथकानं याच कार्यालयाला 4 मुद्द्यांच्या आधारावर माहिती मागितली आहे. समीर वानखेडे यांना जातीचा दाखला आपण दिला का ? आपल्या कार्यालयातील कोणत्या कागदपत्रांच्या आधारे हा देण्यात आलाय ? विहित नमुन्यातील सर्व नोंदी,माहिती याची आपण खात्री केली होती का ? जात प्रमाणपत्र कागदपत्रं / मागणीपत्र / रेकॉर्ड यातील नोंदीत काही खाडाखोड, शाई बदल आढळतात का ?
गूढ कायम
विशेष म्हणजे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहरनंही याच मुद्द्यांवर बोट ठेवलंय. महाराष्ट्र शासनानं नियुक्त केलेल्या विशेष टीमनंही याचा तपास सुरू केलाय. त्यांनी तर थेट जात प्रमाणपत्राच्या प्रतीचीच मागणी केलीये. मात्र, याच कागदपत्रांचा आधार असलेली कागदपत्रं काही सापडायला तयार नसल्यानं, या प्रकरणातील गूढ कायम आहे.
तो विवाह होता की निकाह..
समीर वानखेडेला, 1995 साली जेव्हा पहिलं जात प्रमाणपत्र या कार्यालयानं दिलं, तेव्हा नोकरीत असलेले अधिकारी आणि कर्मचारी आज सेवेत नाही. हे रेकॉर्ड तब्बल 26 वर्ष जुनं असल्यानं ते सापडायलाही तयार नाही. विशेष म्हणजे दिलेल्या दाखल्याची प्रतही या कार्यालयात उपलब्ध नाही, मात्र समीर वानखेडेकडे ही प्रत असल्यानं तिला प्रमाणीत करणं मान्य करणं... हेच शिल्लक राहिलंय का ? नेमका याचाच खुलासा कोर्टानं मागवलाय. ज्ञानदेव यांचा झायेदाबी यासोबत विवाह झाला 14/2/1978 ला. शिवडी वेअरच्या सरकारी निवासस्थानी, त्यांनी विवाह केल्यानं, तो विवाह होता की निकाह.. याचा कोणताच पुरावा नाही. मात्र14/12/1979 ला समीरचा जन्म झाला आणि ज्ञानदेव यांचं दाऊद हे नाव पहिल्यांदा समोर आलं.
दाऊद हे माझं माझ्या पत्नीनं, प्रेमानं ठेवलेलं घरातील नाव हा ज्ञानदेव यांचा खुलासा मानला तरी यानंतर समीरच्या पहिल्या लग्नाच्या पूराव्यांनी हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. डॉ शबाना सोबत केलेला निकाह... या लग्नपत्रिकेत वडील ज्ञानदेव यांचं दाऊद म्हणूनच उल्लेख असलेलं नाव... नेमक्या याच मुद्द्यांवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी बोट ठेवलं. ज्ञानदेव वानखेडे यांचं विवाहाआधी 24/2/1974चं जात प्रमाणपत्र सांगतं की जात शेड्युल कास्ट, महार. यानंतर .. ज्ञानदेव वानखेडे यांच्या अधिकृत सर्व्हिस बुकमधेही जात रेकॉर्ड आहे शेड्युल कास्ट, महार. समीर वानखेडेची खरी जात कोणती ? या एका प्रश्नानं अनेक प्रश्न उपस्थित केलेय.
कुठली कागदपत्रे खरी?
जर एकाच व्यक्तीची 2 परस्परविरोधी खरी कागदपत्रं असतील तर त्यातलं खरं कोणतं ? ज्या 1995च्या कागदपत्रं आधारावर पहिल्यांदा जात प्रमाणपत्र दिलं गेलं, त्याचा आधार, हा गहाळ झाला का गायब झाला ? संविधानावर आधारीत कायद्यावर जर कोर्ट निर्णय घेणार असेल तर शरीयतवर आधारीत मुस्लीम कायद्याचं या प्रकरणात स्थान नेमकं काय आहे ? जर पूर्वजांचा इतिहास पडताळून जात प्रमाणपत्र दिलं जातं तर फक्त वडिलांच्या धर्मबदलाचा अर्थ कसा लावला जाणार ? अश्या अनेक उत्तरांचा निकाल लावणं हे कोर्टालाही आव्हान मानलं जातंय. याच निकालावर अवलंबून आहे. समीर वानखेडे यांच्या सरकारी नोकरीचं भविष्यही. आमचा न्यूज 18 लोकमतचा हाच प्रयत्न की सत्य काय ते मांडता यावं.
अनेक प्रकारे वादात राहिलेल्या समीर वानखेडेच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्नही आता एका इंटरेस्टिंग वादाच्या घेऱ्यात सापडलायशिक्षण आणी नौकरी च्या दरम्यान त्यांनी सादर केलेले कागदपत्र, पूराव्यांनी हे जरूर स्पष्ट होतंय की त्यांचा दावा,हा खराय. मात्र जन्म,विवाह यांच्या समोर आलेल्या पूराव्यांनी, हा मुद्दा जितका सरळ वाटतो तितका नक्कीच नाही हेही समोर आलंय. आता न्यायालय, हे निश्चित करेल की त्यांची खरी जात कोणती ? पण एक मात्र खरं, जात नाही तिच जात ... हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drug case, Nawab malik, NCB