विखे पाटील भाजपातले बाटगे तर राणे पावटे, शिवसेनेचा सणसणीत टोला

विखे पाटील भाजपातले बाटगे तर राणे पावटे, शिवसेनेचा सणसणीत टोला

'काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे'

  • Share this:

मुंबई, 22 जून : महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे.  फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय असे म्हणत शिवसेनेनं भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर  बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात नरमाई भाषा केल्याचे दिसून येते.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावर विखे पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती तसंच उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरुद्ध ही टीका केल्यानंतर सामानातून विखेना उत्तर दिले आहे.

'विसराळू विखे'

'जगभरातील विनोदी साहित्यात विसराळूपणा हे विनोदाचे अंग बनले आहे. मराठी रंगमंच आणि पडद्यावरही ‘विसराळू’ पात्र खास आणून विनोद निर्माण केला जातो. अशा विसराळू पात्रांत आता नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांची भर पडली आहे. ते विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः अधूनमधून करीत असतात. विखे महाशयांनी दोनेक दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबाबत असे महान भाष्य केले की, ‘‘एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत.’’ यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की, ‘‘मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!’’ यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणार्‍यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे' असा सणसणीत टोला सेनेनं विखे पाटलांना लगावला.

'विखे पक्षाशी कधीच एकनिष्ठ नसतात'

'विखे अनेक वर्षे काँगेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात' अशी टीका विखेंवर  करण्यात आली.

विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय?

'स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये. विखे यांनी थोरातांवर हल्ला केला. का, तर बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे काही मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांच्याशी तासभर चर्चा केली. ही चर्चा राज्यापुढील संकटासंदर्भात होती. चर्चेनंतर आपले समाधान झाले असल्याचा खुलासा थोरात यांनी केला. म्हणजे, महाविकास आघाडी स्थिर व मजबूत असल्याची ग्वाहीच थोरातांनी दिली. यावर विखे-पाटलांच्या पोटात खळबळ माजण्याचे कारण काय? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला.

'विखे पाटील बाटगे तर राणे पावटे'

राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले' अशी टीका विखे पाटील आणि नारायण राणे यांच्यावरही करण्यात आली.

'काँग्रेसमधून पलायन केले नसते तर...'

'विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थोरात वगैरे मंडळींचे कष्ट त्या दिशेने तोकडे पडले इतकेच म्हणावे लागेल. पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदरांप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपमध्ये गेल्याने भाजपचा दीडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली' असं म्हणत विखेंच्या जखमेवर बोटही ठेवण्यात आलं.

हेही वाचा - चहा विकणाऱ्याच्या मुलीने स्वप्न केलं पूर्ण; फ्लाईंग ऑफिसर बनून आकाशात घेतली झेप

First published: June 22, 2020, 8:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या