मुंबई, 7 जून : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने रंगत जास्त वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) दोघांकडून बहुमताचा आकडा पार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष आमदारांना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु आहेत. या दरम्यान समाजवादी पक्षाची (Samajwadi Paty) भूमिका अद्याप स्पष्टपणे समजू शकलेली नाही. कारण समाजवादी पक्षाचे नेते महाविकास आघाडीवर बोलताना नाराजी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आपल्या पत्रांना उत्तर देत नाहीत. त्यांचं उत्तर आले की ठरवू. तसेच महाविकास आघाडी सरकारला पाठींबा देऊन आमच्या सर्व इच्छांवर पाणी फेरलं, अशी टीका समाजवादीचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी केलीय. “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. पत्राचं उत्तरं आलं की ठरवेन. आमचं कुणी ऐकत नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या सत्तेला पाठिंबा दिला आणि आता कुणी ऐकत नाही. गेल्या अडीच वर्षात आमच्या सगळ्या इच्छांवर पाणी फेरलं गेलंय. तुमच्यात तर स्पर्धा लागलीय की कोण हिंदुत्ववादी आहे? मला पहिल्याच दिवशी म्हणता आलं असतं की मला मंत्री करा. पण मला सत्ता नको. लालची राजकारण केलं नाही. मी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उत्तराची वाट पाहतोय”, अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली. ( अखेर एकनाथ खडसेंना राजकीय लॉटरी लागणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय ) “स्वार्थ साध्य झाल्यानंतर ओळखत नाही. ते बाजूने जाणार तरी ओळख दाखवणार नाही. स्वत:ची गरज असली की येतात. मी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत जाणार नाही”, असं आझमी यांनी स्पष्ट केलं. तसेच “मला वाटतं की कुणालाही हॉटेलमध्ये ठेवण्याची गरज काय? सगळे घाबरले आहेत”, अशी टीका अबू आझमी यांनी केली. समाजवादीला मुख्यमंत्र्यांची हिंदुत्त्वाची भावना खटकते? दरम्यान, आज एक महत्त्वाची घटना घडली. समाजवादीचे आमदार रईस शेख (Raees Shaikh) यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांची हिंदुत्वाची भावना खटकत असल्याची प्रतिक्रिया दिली. “अनिल परब माझे मित्र आहेत. मी त्यांना नेहमी भेटतो. राज्य सरकारमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर आम्ही सोबत आहोत. पण मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्त्वाची भाषा करत आहेत. यावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आमचे म्हणणे होते. आमचे अध्यक्ष अबू आझमी यांनी फक्त शिवसेनेला नाही तर महाविकास आघाडीला प्रश्न विचारले होते. सरकार सेक्युलर आहे की नाही?”, असा सवाल त्यांनी केला. “आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. भाजप आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल झाला आहे. आम्ही संध्याकाळच्या बैठकीला जाणार नाहीत”, असं स्पष्टीकरण रईस शेख यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.