जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अखेर एकनाथ खडसेंना राजकीय लॉटरी लागणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय

अखेर एकनाथ खडसेंना राजकीय लॉटरी लागणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्हे आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जून : राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक (Rajya Sabha Election 2022) आणि विधान परिषदेच्या (MLC Election 2022) दहा जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राजकीय वनवास आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. खात्रीलायक सूत्रांकडून याबाबतची माहिती मिळाली आहे. एकनाथ खडसे यांच्यासह रामराजे निंबाळकर (Ramraje Nimalkar) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे अनेक दिवसांपासून आमदारकीपासून लांब महाराष्ट्रातील बड्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव घेतलं जातं. एकनाथ खडसे यांनी अनेकवर्ष भाजपसाठी काम केलं. खान्देशात भाजप पक्षाच्या विस्तारात खडसेंचा वाटा महत्त्वाचा मानला जातो. पण भाजपमधील अंतर्गत मतभेदामुळे पुढे खडसे भाजपमधून बाहेर पडले. एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. पण त्यांच्या नाराजीची दखल भाजपच्या हायकमांडकडून फारसी घेतली गेली नाही. त्यामुळे खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. खडसे त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून दोन दशक आमदार म्हणून निवडून आले. त्यांना भाजप सरकारच्या काळात मंत्रीपदही मिळालं. ते राज्याचे महसूल मंत्री होते. पण मंत्री असताना त्यांनी अवैधपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला उतार आला. तरीही खडसे खचले नाही. त्यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ( Maharashtra HSC Result 2022: विद्यार्थ्यांनो, निकाल बघण्यासाठी ‘या’ लिंक्स IMP; असा बघा निकाल ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचं पूनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु होता. त्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर एकनाथ खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत ते निवडून आले तर कदाचित त्यांना मंत्रिमपदाची देखील संधी मिळू शकते. पण आताच त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. आगामी काळात या सर्व गोष्टी अधिक गडदपणे स्पष्ट होतील. विधान परिषदेसाठी शिवसेनेचादेखील मोठा निर्णय दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत तर काही महत्त्वाचे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून दोन नव्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. त्याचा परिणाम म्हणजे शिवसेनेतील एका बड्या मंत्र्याला आपलं कॅबिनेट मंत्रिपद सोडावं लागणार आहे. शिवसेनेनं विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीतून जेष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांना वगळलं असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई हे राज्याचे उद्योगमंत्रीही आहेत. त्यामुळे सुभाष देसाई यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्यास आणि आमदार नसल्याने ते पुढील जास्तित जास्त 6 महिने मंत्रिपदावर राहू शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की पुढील काही महिन्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे नक्की!

विधानपरिषदेच्या 20 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमशा पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात आणि काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेचा धणुष्यबाण तळागाळात पोहचवला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर सचिन अहिर यांनी आपला वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी सुद्धा झाले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांचं पूर्नवसन करण्यासाठी आता शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात