मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातील (Congress Party) नेत्यांनी पक्षाला रामराम करण्याचा सिलसिला सुरुच आहे. यावरुनच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) एक सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
गळती हंगाम सुरूच
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं, राहुल गांधींनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. 2024 ची तयारी मोदी आणि त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील 'गळती' हंगाम सुरूच आहे. या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झालीय. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?
वाचा : राज्यसभेसाठी संजय राऊतांचा 'चौकार', सेनेकडून सलग चौथ्यांदा संधी; 26 मे रोजी भरणार अर्जगळतीचा आरंभ चिंताजनक
काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेस नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून 'गळती' हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही. पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी 'हाक' दिली असतानाच नव्याने गळतीचा आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
वाचा : सहाव्या जागेसाठी सेनेची मोर्चेबांधणी सुरू, मुख्यमंत्र्यांनी 9 अपक्ष आमदारांना 'वर्षा'वर बोलावलेहे नेतृत्वाचेही अपयश
माधवराव शिंदे, जीतेंद्र प्रसाद आणि बलराम जाखड या तिन्ही नेत्यांना काँग्रेसने भरभरुन दिले. त्यांच्या मुलांचेही कल्याण करण्यात काँग्रेसने कधी हात आखडता घेतला नाही. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद आणि सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठ्या निघाल्या. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी काँग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
आज काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही आणि उदयपूरच्या चिंतन शिबिरात त्यावर चर्चा झाली, पण नेतृत्वाचा प्रश्न अधांतरी ठेवून चिंतन शिबीर संपवले गेले. चिंतन शिबिरात काही निर्णय झाले. 'एक व्यक्ती एक पद' वगैरे घोषणा झाल्या. घराणेशाहीलाही विरोध झाला, पण जाखड यांच्या पाठोपाठ गुजरातच्या हार्दिक पटेलनेही काँग्रेस सोडली. ज्या राज्यांत आता निवडणुका आहेत. त्या राज्यांत जनसंपर्क असलेल्या नेत्यांना तरी काँग्रेसने सांभाळले पाहिजे असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.