मुंबई, 08 जून : बहुप्रतीक्षित दहावीच्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांची धाकधूक संपली. या परीक्षेत कर्णबधीर विद्यार्थ्यांनीही मोठी भरारी घेतली आहे. चेंबूरच्या रोचिराम.टी थडानी हायस्कुल फॉर हिअरिंग अँड हँडिकॅप या शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. राहुल कुऱ्हाडे या विद्यार्थ्याने 85.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर 84.60 टक्क्यांसह प्रज्वल कदमने दुसरा आणि 81.40 टक्क्यांसह श्रुती कानसरे या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मूकबधीर असूनही मेहनतीच्या जोरावर आणि पालक, शिक्षकांच्या साथीने त्यांनी हे यश मिळवलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा रोचिराम.टी थडानी शाळेतून 20 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 10 जण मराठी आणि 10 जण हिंदी माध्यमातून होते. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तम गुणांनी यश मिळालं आहे. त्यांच्या या यशामुळे शिक्षक आणि पालकवर्गात आनंदाचं वातावरण आहे.
आपलं बाळ कर्णबधीर आहे हे कळल्यावर आई-वडिलांमधला अर्धा आत्मविश्वास संपलेला असतो, मात्र उरलेल्या आत्मविश्वासाने ते आपल्या बाळाला वाढवण्याचा निर्णय घेतात. त्यामुळेच ही मुलं जन्मतःच अत्यंत हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्यांच्याशी निगडित प्रत्येक गोष्टीसाठी पालकांना, शिक्षकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अशा उत्तम निकालाच्या रूपात फळ मिळाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. (SSC CHSL Recruitment: सरकारी नोकरीसाठी जागा तब्बल 1600 अन् पात्रता फक्त 12वी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक) दरम्यान, ‘सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच या खास विद्यार्थ्यांसाठीही दहावीची परीक्षा म्हणजे, आयुष्याची पहिली पायरी होती. आता खऱ्या अर्थाने त्यांना दुनियादारी कळायला सुरुवात होईल आणि आयुष्याच्या परीक्षेतही ते 100 टक्के खरे उतरतील’, असा विश्वास या शाळेच्या शिक्षिका वनिता धुरी आणि निवेदिता दामले यांनी व्यक्त केला आहे.