खासदार संभाजीराजे छत्रपती 'खाबूगिरी आणि बाबूगिरी'ला कंटाळले, राजीनामा देणार?

खासदार संभाजीराजे छत्रपती 'खाबूगिरी आणि बाबूगिरी'ला कंटाळले, राजीनामा देणार?

खासदार संभाजीराजे छत्रपती भ्रष्टाचार आणि मनमानीला कंटाळले आहेत..

  • Share this:

मुंबई,27 डिसेंबर:रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप खुद्द रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे भ्रष्टाचार आणि मनमानीला कंटाळून रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती रायगडावर आहेत. रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजे म्हणाले, प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणारी कामे पुरातत्व विभागाकडून रोखली जात आहेत. महाड ते पाचाड मार्गाच्या कामात टक्केवारी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केली. यांसदर्भात संबधित विभागांशी पुराव्यासह पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संभाजीराजे यांनी व्यक्त केली नाराजी

रायगड किल्ल्यावर प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांना कार्यारंभाचे आदेश दिल्यानंतर पुरातत्व विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने करायचे, तर इतर काम प्राधिकरणाच्या विशेष विभागाने करायचे असे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार काही कामे प्राधिकरणाने सुरु केली होती. मात्र पुरातत्व विभागाने ती थांबवली. हे चुकीचे आहे, असे सांगत संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती भ्रष्टाचार आणि मनमानीला कंटाळले असून ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

शिवभक्तांची लूट सुरु

दुसरीकडे, रोप वेकडून गडावर येणाऱ्या शिवभक्तांची लूट सुरु आहे. ती थांबली पाहिजे असं यावेळी संभाजीराजेंनी म्हटले आहे. रायगड प्राधिकरण तसेच संबधित यंत्रणांची कुठलीही परवानगी न घेता रायगड रोप-वे च्या संचालकांकडून विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी बांधकामही करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रोप वेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद रायगड संवर्धन आराखड्यात करण्यात आली आहे. असे असतांना प्राधिकरणाला अंधारात ठेऊन खासगी रोप-वे ला परवानगी देण्याचा घाट पुरातत्व विभागाने परस्पर घातला आहे. असाही आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती त्यांनी केला. हे काम तात्काळ थांबले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 12:22 PM IST

ताज्या बातम्या