मुंबई, 22 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या शर्यतीत बंजारा समाजही उतरल्याचं चित्र आहे. श्री क्षेत्र पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपली वर्णी लावून बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व द्या अशी मागणी यावेळी सुनील महाराज यांनी केली. अन्यथा संजय राठोड यांचं मंत्रिमंडळात पुनर्वसन करा, असंही बंजारा समाजाकडून सांगण्यात आलं. राज्यसभेसाठी मी शिवसेनेत प्रवेश करू शकतो असंही सुनील महाराज यावेळी म्हणाले.
तर दुसरीकडे शिवसेना शिष्टमंडळाने संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप दिला आहे. शिवसेना शिष्टमंडळाने उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता वर्षा निवास्थानी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण त्यांना देण्यात आले आहे. शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर संभाजी राजे छत्रपती यांची राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर घोषणा करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
शिवसेना शिष्टमंडळातील नेते शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शिष्टमंडळाने संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा करून शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप दिला. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही फोनवरून संभाजीराजे छत्रपती यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतरही संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेना पुरस्कृत उमेदवारी मिळवण्याची इच्छा, उद्या संभाजीराजे छत्रपती वर्षा निवास्थानी येऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का...? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेना शिष्टमंडळ आणि संभाजीराजे छत्रपती यांची ट्रायडंट हाँटेलमधील बैठक संपली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.