मुंबई, 26 मे : राज्यसभेच्या (Rajya Sabha) दोन जागांवर आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी शिवसेनेच्या ऑफरला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेवर उमेदवारी दिली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहाव्या जागेवर संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजीराजे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी स्तव: आणि कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. मी खात्रीने सांगू शकतो की, या वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात शंका नाही.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून खा. संजय राऊत, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, रा. काँ.चे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. pic.twitter.com/JHmBiGvlGr
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) May 26, 2022
मविआचे चारही उमेदवार विजयी होणार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे 31 मे रोजी ते अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवारही लवकरच आपला अर्ज दाखल करेल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने तीन, चार उमेदवार देवो... आम्ही आमच्या जागा निवडून आणणार. त्यांनी ईडी, सीबीआयचा दबाव टाकून जर वाटत असेल की जागा जिंकू तर त्यांनी प्रयत्न करत रहावे. आम्हाला पूर्ण अधिकार आहे आमच्या जागा लढण्याचा... शिवसेना अशा दबावाला भीक घालत नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
संभाजीराजे काय भूमिका घेणार?
सहाव्या जागेवर शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता भाजप संभाजीराजेंना समर्थन देणार की आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरवणार हे पहावं लागेल. तसेच संभाजीराजे हे निवडणूक लढणार की अर्ज दाखल न करताच माघार घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीराजे या संदर्भात लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
काय आहे संख्याबळ?
सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.
राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajyasabha, Sambhajiraje chhatrapati, Sanjay raut, Shiv sena