'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट', शिवसेना भवनसमोरच मनसेची पोस्टरबाजी

'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट', शिवसेना भवनसमोरच मनसेची पोस्टरबाजी

राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी केली आहे.

  • Share this:

मुंबई,17 जानेवारी: राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट दादर येथील शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी केली आहे.'सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट' असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. मनसेची पोस्टरचे खास म्हणजे हे पोस्टर भगव्या रंगात आहे. त्यामुळे मनसे-भाजपमध्ये युती तर करत नाही आहे ना, अशा चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मनसेचे अधिवेशन होणार आहे. त्याआधीच मनसेने मुंबईत पोस्टरबाजी सुरू केली आहे. राज ठाकरे यांची प्रतिमा असलेल्या भगव्या पोस्टरवर 'महाराष्ट्र धर्म सम्राट' असा उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आले आहे, तेव्हा तेव्हा राज ठाकरे आणि मनसे उभी राहिली आहे. तोच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले. या पोस्टरच्या माध्यमातून कोणालाही डिवचण्याचासाठी आमचा हेतू नाही, असेही देशपांडे यांनी सांगितले.

सरकारवर थेट निशाणा...

आम्ही महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहोत. सत्तेसाठी सगळे येत आहेत. पण महाराष्ट्र धर्माचे पालन होताना दिसत नाही, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी थेट महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला. राज्यात सत्तेवर आलेले सरकार म्हणजे केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

अंतिम निर्णय राजसाहेबांचा..

मनसेचे पोस्टर भगव्या रंगात असून आता पक्षाचा झेंड्याचा रंगही बदलणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, मनसेच्या झेंड्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 02:42 PM IST

ताज्या बातम्या