मुंबई, 16 जून : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नेता नवीन जिंदल (Navin Jindal) यांच्या अटकेसाठी देशभरात मुस्लिम समाजाकडून आंदोलन सुरू आहे. आता या प्रकरणात रझा अकादमीने (Raza Academy) एंट्री केली आहे. रझा अकादमीने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस आता दिल्लीत जाऊन नुपूर शर्मांना नोटीस देणार आहे. नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. सौदी राष्ट्रांनी त्यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. त्यानंतर देशभरात नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या अटकेची मागणी होत आहे. मुंबईमध्ये रजा अकादमीने नुपूर शर्मांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी नूपुर शर्मांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील पायधुणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून समन्सही बजावण्यात आला आहे. ( 63 वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, 1959 नंतर पहिल्यांदाच… ) याआधी मुंबई पोलिसांनी ई-मेलद्वारे समन्स बजावला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांची टीम आता दिल्लीत पोहोचली आहे. नुपूर शर्मा यांना समन्स बजावला जाणार आहे. त्यानुसार, मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये 25 जून रोजी 11 वाजता आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावे लागणार आहे. काय आहे नेमकी घटना? भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी माझे शब्द मागे घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते. कोण आहे नूपुर शर्मा? नुपूर शर्मा यांचा जन्म 23 एप्रिल 1985 रोजी नवी दिल्लीत झाला. त्यांनी दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मधून शिक्षण घेतले आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्र (ऑनर्स) ही पदवी घेतली आहे. नूपुर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एलएलएमही केले आहे. नुपूर शर्मा कॉलेजपासून राजकारणात सक्रिय आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) तिकिटावर त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (डीयूएसयू) अध्यक्षही झाल्या आहेत. 2015 मध्ये नुपूर शर्मा यांना भाजपच्या प्रवक्त्या बनवण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.