मुंबई, 08 फेब्रुवारी : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सध्या चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध निहार ठाकरे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाणार असे वृत्त प्रसिद्ध झाले होते, पण शिंदे गटाकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघ सध्या शिंदे गट आणि भाजपच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून निहार ठाकरे यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र या संदर्भात अजून कुठलाही विचार सुरू नसल्याचं बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. (…म्हणून थोरातांनी उपसले राजीनामास्त्र, काँग्रेसमधील राजकारणाची INSIDE STORY) ॲाक्टोबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांवर एप्रील आणि मे २०२४ मध्ये पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरच अधिकृत विचार होऊ शकतो अशीही माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. ( मुंब्र्याच्या नामकरणावरून राजकारण तापलं; भाजपने पुन्हा आव्हाडांना डिवचलं ) दरम्यान, वरळीच्या कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीमध्ये माझ्याविरुद्ध निवडणुकीला उभं राहून दाखवावं. वरळी नसेल तर मी ठाण्यात तुमच्याविरुद्ध निवडणूक लढवायला तयार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. ‘काही जण सकाळी उठतात, खोके गद्दार बोलतात. काही लोक मला आव्हान देत आहेत. मी आमच्या लोकांना सांगितलं. मी छोटी-मोठी आव्हानं स्वीकारत नाही. मला जे आव्हान स्वीकारायचं होतं ते सहा महिन्यांपूर्वी पूर्ण केलं. जास्त इच्छा असेल तर महापालिका वॉर्डात उभे राहा,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.