सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत बोलणं झालं? शरद पवारांनी फडणवीसांबद्दलच केला गौप्यस्फोट

सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत बोलणं झालं? शरद पवारांनी फडणवीसांबद्दलच केला गौप्यस्फोट

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला सविस्तर मुलाखत दिली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेलं राजकीय नाट्य, सध्याचं कोरोनाचं संकट इथपासून मोदी सरकारची कामगिरी अशा विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

शिवसेनेआधी शरद पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चर्चा केली होती, असा आरोप भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी सडेतोड उत्तरे दिली. 'सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहीत नाही', असा ‘स्फोट’ शरद पवार यांनी केला.

शरद पवारांची महामुलाखत; भाजपला फटकारलं, फडणवीसांवर टोलेबाजी

प्रश्न : माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले की, माझं सरकार गेलं किंवा मी मुख्यमंत्रीपदी नाही हे पचवणं खूप कठीण गेलं. हे समजून घ्यायलाच दोन दिवस लागले. याचा अर्थ असा आहे की, आपली सत्ता कधीच जाणार नाही या भूमिकेत…अमरपट्टाच बांधून आलेलो आहोत.

– हे पहा, कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱया व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. याचा अर्थ असा आहे की, या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांपेक्षा अधिक शहाणा आहे आणि आमचं पाऊल चाकोरीच्या बाहेर टाकतोय असं दिसलं की तो आम्हालाही धडा शिकवतो. त्यामुळे कोणतीही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच! आम्हीच येणारच… तर लोकांना ते आवडत नाही.

प्रश्न : 105 आमदारांचं बळ असतानासुद्धा प्रमुख पक्ष सत्ता स्थापू शकला नाही. सत्तेवर येऊ शकला नाही. हीसुद्धा एक अजब कला किंवा महाराष्ट्रात चमत्कार होता. याला तुम्ही काय म्हणाल?

– असं आहे की, तुम्ही ज्याला प्रमुख पक्ष म्हणताय तो प्रमुख कसा बनला याच्याही खोलात जायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की, विधानसभेला त्यांच्या आमदारांची 105 ही जी फिगर झाली त्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यातून तुम्ही शिवसेना मायनस केली असती, त्याच्यात सामील नसती तर 105 चा आकडा तुम्हाला कुठेतरी 40-50 च्या आसपास यावेळी दिसला असता. भाजपचे लोक जे सांगतात की, आम्ही 105 असतानाही आम्हाला आमच्या सहकाऱयाने म्हणजे शिवसेनेने दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं. त्यांना 105 पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहीत धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटत नाही की इतरांनी काही वेगळं करण्याची आवश्यकता आहे.

प्रश्न : पण त्यांना जे जमले नाही ते शरद पवार यांनी जमवून दाखवलं आणि शिवसेनेला भाजपशिवाय मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचवलं.

– असं म्हणणं हे पूर्ण खरं नाही. मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत, पण बाळासाहेबांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही.

? असं का वाटतं आपल्याला?

– सांगतो ना. त्याचं कारण असं आहे की, बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात अंतर होतं. विशेषतः कामाच्या पद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटलबिहारी वाजपेयींचा केला, त्यांनी आडवाणींचा केला, त्यांनी प्रमोद महाजनांचा सन्मान केला. या सगळय़ांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला. दुसरी गोष्ट अशी होती की, काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. शिवसेना ही काँग्रेसच्या कायमचीच विरोधात होती असं नाही.

बाळासाहेब हे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट हे तोंडावर म्हणणारे नेते होते. त्यामुळे हे घडलं असावं.

– हो बाळासाहेब तसेच होते. जितके रोखठोक तितकेच दिलदार. राजकारणात ही अशी दिलदारी दुर्मिळ आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही या देशातील एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती होईल याची यत्किंचितही तमा न बाळगता पाठिंबा द्यायचे. म्हणजे आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा फैसला करणारे नेतृत्व म्हणून बाळासाहेब इंंदिरा गांधींसोबत उभे राहिले. नुसतेच उभे राहिले असं नाही तर आम्हाला सगळय़ांना धक्काच बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली, की महाराष्ट्राच्या निवडणुकीत मी उमेदवारसुद्धा उभा करणार नाही! राजकीय पक्ष चालवणाऱयांनी मी उमेदवार उभा करणार नाही असं म्हणून त्या संघटनेचे नेतृत्व टिकवणं ही काही साधी गोष्ट नाही, पण ते बाळासाहेब ठाकरे करू जाणोत आणि त्यांनी ते केलं. त्याचं कारण काँगेससंबंधी त्यांच्या मनात तसा विद्वेष नव्हता. काही धोरणांसंबंधी स्पष्ट मतं होती. त्यामुळे तो एक वेगळा पैलू त्यावेळी पाहायला मिळाला आणि आज कमीजास्त प्रमाणात त्याच मार्गाने उद्धव ठाकरे चाललेत असं म्हणायला हरकत नाही.

Published by: Akshay Shitole
First published: July 11, 2020, 8:39 AM IST

ताज्या बातम्या