मुंबई, 15 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले आहेत. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राज्यसभेची निवडणूक हा प्राथमिक आणि महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा असणार आहे. राज्यसभेची निवडणूक आगामी काळात येऊ घातली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या निवडणुकीबाबत घोषणा देखील झाली आहे. येत्या 10 जूनला राज्यसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जेव्हा भेट होते तेव्हा अनेक राजकीय अभ्यासक, पत्रकारांचं लक्ष या भेटीकडे असतं. कारण या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमागे विविध महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा होते. अर्थात काही चर्चा या सरकार आणि महाविकास आघाडीशी संबंधित असल्याने प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाहीत. पण तरीही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील नेत्यांमध्ये धुसफूस असल्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचतेच. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आतादेखील झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
('राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, हनुमानजी त्यांना वरुनच उचलून घेतील', भाजप खासदाराचा इशारा)
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात या भेटीत राज्यसभेच्या जागांसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. 31 मे पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सहा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या तीन जागा आहेत. भाजपच्या दोन जागा निश्चित आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस असणार आहे. तर सहावा उमेदवार कुणाचा ठेवणार? त्याला कसं निवडून आणायचं? कारण महाविकास आघाडीकडे 22 मते शिल्लक राहतील तर भाजपकडे 27 मते शिल्लक राहू शकतात. त्यामुळे पुढे कशी रणनीती आखायची? याबाबत या दोन बड्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील राजकारणावर चर्चा
हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर केलेला निशाणा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबल, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल घेतलेल्या सभेतून सगळ्यांचा समाचार, या मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला थांबविण्यासाठी सत्ताधारी तीनही पक्षांनी एकत्र येऊन लढायचं का? या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.