Home /News /mumbai /

केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

मराठी मालिका अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने खळबळ उडाली आहे.

    हिंगोली, 14 मे : मराठी मालिका अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने खळबळ उडाली आहे. केतकी चितळेने केलेल्या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी स्वत: ट्विटरवर केतकीच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला आहे. केतकीच्या टीकेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे. केतकीच्या या टीकेबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला संबंधित प्रकरणाची माहिती नसल्याचं बोलत या विषयावर फारसं भाष्य करणं टाळलं. "कोण केतकी? नेमकं काय प्रकरण आहे हे मला ठाऊक नाही. संबंधित व्यक्तीही मला माहिती नाही. तुम्ही सांगता तेही माहिती नाही. त्यांनी काय केलं. तक्रार काय होती. नेमकं काय केलं ते कळाल्याशिवाय बोलता येत नाही", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. "दोन-तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचण्यात आली. एका कवीच्या काव्याचा मी भाषणात उल्लेख केला होता. त्यावर काही लोकांनी वेगळं मत मांडलं पण ते वास्तव नव्हतं", असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले. केतकी चितळेला अटक शरद पवार  यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणं अभिनेत्री केतकी चितळेला प्रचंड महागात पडलं आहे. कारण शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कलंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिला एका रूममध्ये बसून ठेवले आहे. काही वेळातच तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. कळवा पोलीस काही वेळातच कळंबोळी पोलीस ठाण्यात पोहचणार आहेत. ('शरद पवार यांच्याबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा.... ' अमोल कोल्हे केतकीवर भडकले) राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार आता या प्रकरणी आता गुन्हे शाखा 1 कडून तपास सूरु असल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी सांगितले आहे. केतकीच्या टीकेवर राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देखील केतकी चितळेने केलेल्या पोस्टवर आपली भूमिका मांडली आहे. केतकी चितळेची पोस्ट म्हणजे विकृती आहे. या विकृतीला वेळीच आवर घालायाला पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. शरद पवरांसोबत आमचे मतभेद जरुर आहेत. पण ते वैचारिक मतभेद आहेत. केतकी चितळेने केलेल्या पोस्ट सारखं घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. "कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो", अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. "महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत.! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरुर आणि आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे इथे स्पष्टपणे सांगणे गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे", असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले. "चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं! कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा", असं ते म्हणाले. "पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती या खरंच आहेत की नवा वाद उकरुन काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. कारण या अशाच चार-दोन विकृत टोळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यानाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गजेचं आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारने याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा", असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या