Home /News /mumbai /

महामानवाला अभिवादन करण्यासाठी समीर वानखेडे चैत्यभूमीवर, पण नवाब मलिक म्हणतात....

महामानवाला अभिवादन करण्यासाठी समीर वानखेडे चैत्यभूमीवर, पण नवाब मलिक म्हणतात....

मुंबई एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं.

  मुंबई, 6 डिसेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज शेकडो बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर (Chaityabhumi) दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मुंबई एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे देखील आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. पण ते जेव्हा चैत्यभूमीवर दाखल झाले तेव्हा त्यांना काही अनुयायांनी विरोध केला. त्यांनी वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा अधिकार नाही म्हणत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर काहींनी वानखेडेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, वानखेडे यांच्या चैत्यभूमीवरील भेटीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

  "कोणी काय केलं ते मला माहिती नाही. बाबासाहेब हे कुठल्याची एका धर्माचे किंवा जातीचे नाहीत ते लोकांना कळलं पाहिजे. बाबासाहेबांना वंदन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कुणी बाबासाहेबांचे कार्य स्वीकारत असेल. वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करायला आले ते चांगलं आहे. आजच्या घडीला जय भीम नावाचा सिनेमा आला. त्या सिनेम्यात बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख नाही. जय भीम म्हणजे अन्यायाविरोधातील एक लढा आहे. त्याच इम्पॅक्टमुळे लोक या ठिकाणी येत आहेत", असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. हेही वाचा : धर्म कसा बदलला जातो, धार्मिक बदलाने हिंदू होता येतं का? कायदा काय सांगतो?

  समीर वानखेडे नेमकं काय म्हणाले?

  "बाबासाहेब आमचे प्रेरणास्थान आहेत. आजच्या दिवशी आमचा लढा चाललेला आहे. बाबासाहेबांकडून प्रोत्साहन मिळतं. बाबासाहेबांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मी इथे आलो आहे. आमचा जो संघर्ष सुरु आहे त्यामागे बाबासाहेबांकडून प्रेरणास्थान मिळालेली आहे", अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांंनी दिली.

  कोरोना संकटामुळे बाबासाहेबांना यावर्षीबी घरुनच अभिवादन

  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने दरवर्षी देशभरातील लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर दाखल होतात. आजच्या दिवशी दादरच्या चौत्यभूमीजवळ पुस्तकांचे स्टॉल असतात. लाखो अनुयायी पुस्तकं खरेदी करतात. पण कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून बाबासाहेबांच्या देशभरातील लाखो अनुयायांना चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करता आलेलं नाही. यावर्षी तरी त्यांची चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करण्याची इच्छा पूर्ण होईल, अशी आशा असताना ओमायक्रोन नावाचं नवं संकट राज्यावर धडकलं आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आज पुन्हा सर्व भीम अनुयायांना घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या