मुंबई, 10 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा नवा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fandnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना मोठ-मोठ्या पदांवर बसवले. तसेच गुन्हेगारांना आसरा दिल्याचाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे. (Nawab Malik claimed Devendra Fadnavis put criminals on higher posts in government)
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मोठ्या पदावर बसवलं
बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपी इम्रान आलम शेख हा अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष बनवलेल्या हाजी अराफत शेख याचा छोटा भाऊ आहे. हाजी अराफत शेख याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षात घेत अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवलं. नागपुरातील मुन्ना यादव याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदावर बसवलं. हैदर आझम हा बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. याच्या दुसऱ्या पत्नीवर बनावट कागदपत्रांच्या संदर्भात मुंबईतील मालाड पोलिसांत गुन्हा दाखल होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन गेला होता असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
वाचा : अखेर मलिकांनी हायड्रोजन बॉम्ब फोडलाच
रियाज भाटी कोण? नवाब मलिकांचा सवाल
नवाब मलिकांनी म्हटलं, मी देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला विचारु इच्छितो की, रियाज भाटी कोण आहे? 29 ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर बनावट पासपोर्टसह पकडण्यात आलं. त्याच्यावर दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. डबल पासपोर्टसह एखाध्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि दोन दिवसांत सुटला जाईल यामागे कोणता खेळ होता. रियाज भाटी तुमच्या सोबत सर्वच कार्यक्रमात का दिसत होता. रियाज भाटी भाजपच्या सर्व कार्यक्रमात कसा दिसत होता. देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात रियाज भाटी कसा उपस्थित होता. पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला.
गुंडांच्या मार्फत वसुलीचं काम
देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सरकारी पदावर बसवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं. ठाण्यात पोलीस आयुक्त बसवत वसुलीचं काम केलं. विदेशातून गुंडाच्या मार्फत फोन करुन इकडे सेटलमेंट पोलीस करत होते आणि तुमच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकरण राज्यात सर्रास सुरू होतं असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत संबंध असलेला व्यक्ती पंतप्रधानांच्या कार्यक्रमात पोहोचतो म्हणजे त्याला कुणाचा तरी आशीर्वाद होता त्यामुळेच तो कार्यक्रमात पोहोचला. दाऊद इब्राहिमचा खास आहे रियाज भाटी. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत रियाज भाटी याचे. आज तो फरार आहे. ठाण्यातून जेवढी वसुली होत होती त्याच्यातील तो एक प्रमुख व्यक्ती होता असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Nawab malik