मुंबई, 21 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या प्रहार (Prahar) या वृत्तपत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा ! हिंदू तितुका मेळवावा !! हिंदुस्थान धर्म वाढवावा !!! किती हा बोगसपणा आणि खोटारडेपणा? किती ही बनवाबनवी ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म. तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करुन मिळवलेले मुख्यमंत्रिपद अशा शब्दांत प्रहारमधून टीका करण्यात आली आहे.
हिंमत असेल तर शिंगावर घ्या ! दिवस आणि वेळ कळवा !!
हिंमत असेल तर शिंगावर घ्या असं थेट आव्हानही प्राहरमधून करण्यात आलं आहे. "शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत सामनामध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. मेळाव्याचे फोटो पाहिले. अंतर ठेवून बसलेले शिवसैनिक. अनेकांच्या डोळ्यासमोर मोबाइल. हॉलमध्ये क्षमता किती? त्याच्या अर्ध्या संख्येमध्ये जल्लोष काय आणि दरारा काय? कोणाला दाखविता दरारा?" असा सवालही प्रहारमधून करण्यात आला आहे.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात व्हायचा. मेलाव्याला शिवाजी पार्कचे मैदान पुरत नसे. आत शिरायला जागा नसायची. या वेळेचा 'ऐतिहासिक' दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये तुटपुंज्या सैनिकांच्या उपस्थितीत झाला. त्यात कसला जल्लोष आणि कसला दरारा! संजय राऊत हनुमंताचा गणपती करण्यात पटाईत! दांडग्या पैलवानासमोर अपंग माणसाला उभा करुन ते त्याच्याही तोंडी शब्द घालतील, 'या अंगावर!' असंही प्रहारमध्ये म्हटलं आहे.
वाचा : शिवसेनेनं कसली कंबर, मुंबईतील शाखा होणार हायटेक, आदित्य ठाकरेंनी दिली नवी आयडिया!
प्रहारमधील अग्रलेखात पुढे म्हटलंय, या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी 'नामर्द', 'अक्करमाशा', 'निर्लज्जपणा' असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी 'सामना'मध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही.
शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे. भारतीय जनता पक्ष देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही 56. आयत्या बिळावरचे नागोब. भाजप महाराष्ट्रात 106 आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा 145. भारतीय जनता पक्षाबाबत आणि आमच्या नेत्यांबाबत ही भाषा आपण वापराल आणि बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जिभेचा सैरावैरा वापर करू नका असंही प्रहारच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.