मुंबई, 11 एप्रिल : महाराष्ट्रात Coronavirus च्या रुग्णांची संख्या चिंताजनक पद्धतीने वाढते आहे. मुंबईत अजूनही वेगाने रुग्णसंख्या वाढते आहे आणि मुंबईच्या हॉटस्पॉट्समध्ये कोरोनाचं संक्रमण थांबवणं मोठं आव्हान वाटू लागलं आहे. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत शनिवारी चौथा Covid-19 चा मृत्यू नोंदवला गेला. मुंबईच्या धारावीच्या हॉटस्पॉटमध्ये आता प्रत्येकाचं स्क्रीनिंग करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. शनिवारी नोंदला गेलेला मृत्यू मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका 80 वर्षीय वृद्धाचा आहे. हा वृद्ध धारावीत राहात होता. यामुळे फक्त धारावीतच कोरोनामुळे चौघांचा बळी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. हे वृद्ध गृहस्थ बालिगा नगर मधील रहिवासी होते. त्यांच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. मुलामुळेच त्यांना संसर्ग झाला, असं समजतं.
Death toll due to #COVID19 in Dharavi rises to 4 after an 80-year-old man died at Kasturba Hospital: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Mumbai pic.twitter.com/5dN6OAhpQN
— ANI (@ANI) April 11, 2020
मुंबईतल्या धारावी परिसरात आजपासून प्रत्येक घरात जाऊन तपासणीला सुरुवात झाली आहे. सुमारे 8 लाख लोक धारावीत राहतात. या प्रत्येकाचं स्क्रीनिंग करण्यात यावं, अशी मागणी होत आहे. महापालिकेनं त्यासाठी मिशन धारावी हाती घेतलं आहे. वाचा - राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा, PMच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी या मोहिमेत खासगी डॉक्टर्स आणि पालिका वैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत. कुणालाही ताप सर्दी खोकला अशी लक्षणं आढळून आली तर त्यांना क्वारंटाइन करून यांचे कोरोना चाचणी केली जाणार आहे.त्यासाठी IMA ने 150 खासगी डॉक्टरांची टीम तयार केलेली आहे. दोन खाजगी डॉक्टर, पालिकेचे दोन आरोग्य अधिकारी आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची टीम घरोघरी जाणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. याभागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाचा - कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, हल्लेखोरांमध्ये एक होता पॉझिटिव्ह मुंबईत कालच्या एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गेल्या 12 तासांत 72 कोरोनारुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. देशभरातील 7 हजार 400 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,666 रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. गेल्या 12 तासांत 92 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांकडून दगडफेक आणि जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे PHOTOS